कळवण – वसंतदादा पाटील साखर कारखान्यातील संचालक मंडळाने निर्यातीसाठी दिलेली साखर निर्यातदाराने देशांतर्गत बाजारात विकून कारखान्याचे नुकसान केल्याप्रकरणी निर्यातदार व तत्कालीन संचालक मंडळावर दाखल केलेल्या आरोपपत्रातून सर्व २२ संचालकांची सटाणा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, विठेवाडी येथील वसंतदादा पाटील साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने केंद्र सरकारच्या परवानगीने ५५ हजार क्विंटल साखर निर्यातीसाठी निर्यातदार व्यापाऱ्याला विकली तथापी निर्यातदाराने देशांतर्गत बाजारात ती साखर विकून १ कोटी रुपयापेक्षा अधिक नफा कमवला, या बाबत तक्रार झाल्याने शासनाच्या वतीने व्यापारी आणि तत्कालीन संचालक मंडळाविरुध्द नाशिकचे जिल्हाधिकारी यांनी साखर नियंत्रण आदेश १९६६चे नियम ९ चे उल्लंघन करुन जीवनावश्यक वस्तु कायदा कलम 3/6 , ८ व ९ अन्वये सटाणा न्यायालयात आरोप पत्र दाखल केले होते. सदर केसची अंतिम सुनावणी होऊन सटाणा न्यायालयाचे न्यायाधीश विक्रम आव्हाड यांच्या न्यायालयात झाली. न्यायाधीश आव्हाड यांनी सदर खटल्यात १६ डिसेंबर रोजी सर्व २२ आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
माजी आरोग्यमंत्री कै डॉ दौलतराव आहेर यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ कार्यरत असतांना हे वादग्रस्त प्रकरण उदभवले होते,
या केसचे काम सन २००८ पासून सटाणा न्यायालयात चालू होते, दरम्यानच्या काळात डॉ दौलतराव आहेर व इतर ४ संचालकांचे निधन झाले. दीर्घकाळ चाललेल्या या खटल्यात कळवण, सटाणा, मालेगाव व देवळा या चारही तालुक्यातील प्रमुख नेते डॉ. दौलतराव आहेर, पोपटराव वाघ, विश्वासराव देवरे, नारायण पाटील, मंजुळाबाई पगार, तुळशीराम बिरारी, सुधाकर पाटील, शशिकांत पवार, संतोष मोरे, धनसिंग वाघ, फुला जाधव, बाजीराव पवार आदी संचालकसह साखर विभागाकडील अधिकारी व कर्मचारी आरोपी असल्याने जिल्ह्यातील साखर उद्योगातील नेत्यांचे व जनतेचे या खटल्याच्या निकालाकडे लक्ष लागले होते, न्यायालयात सर्व २२ आरोपींची बाजू कळवणचे जेष्ठ ऍड देवेंद्र सोनवणे यांनी मांडली त्यांना सटाण्याचे ऍड अभिमन्यू पाटील आणि ऍड प्रशांत भामरे यांनी साहाय्य केले.