सटाणा – वसंतदादा सहकारी साखर कारखान्याची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे स्पष्ट होत आहे. कारखान्याच्या संरक्षक भिंतीला तिसऱ्यांदा भगदाड पडले आहे. त्यामुळेच अवसायक राजेंद्र देशमुख यांनी सद्यस्थितीची पाहणी केली आहे.
गेल्या दोन-तीन दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे कारखान्याची संरक्षक भिंत काही ठिकाणी कोसळली आहे. वसाकाच्या दक्षिण बाजूला असलेली सुमारे १२०० मीटर लांब व ७ फूट उंच संरक्षक भिंतीला जागोजागी भगदाड पडत आहे. त्यामुळे कारखान्याची कोट्यवधीची मालमत्ता धोक्यात आली आहे. ठराविक अंतराने एकाच सर्वेनंबर मध्ये भिंत कोलमडून पडत आहे. त्यामुळे कारखान्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सुरक्षा कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नसल्याने त्यांची संख्या मर्यादित आहे. त्यांना वेळेवर वेतन उपलब्ध करून दिल्यास कारखान्याची सुरक्षा राखली जाईल, असे वसाका मजदूर युनियनचे कार्याध्यक्ष कुबेर जाधव यांनी अवसायक राजेंद्र देशमुख यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. दरम्यान, यंदा कारखाना सुरू करावा, असा आग्रह युनियन अध्यक्ष अशोक देवरे यांनी देशमुख यांच्याकडे केली आहे.