सटाणा – येथील स्वर्गीय वसंतराव दगाजी पाटील ट्रस्ट वतीने स्वर्गीय वसंतराव पाटील यांच्या १५ पुण्यस्मरण निमित्ताने ३ दिवसीय वसंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. २५ ते २७ ऑगस्ट दरम्यान ही व्याख्यानमाला होणार असल्याची माहिती हार्टस् संजीवनी अॅण्ड मल्टीमेडीकल रिसर्च ग्रुप व ट्रस्ट चे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी दिली आहे.
गत १४ वर्षांपासून सटाणा शहरात अव्याहतपणे सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेचा करोना महामारीच्या काळात देखील खंड पडून न देता सलग १५ व्या वर्षीही वसंत व्याख्यानमाला अखंड सुरू ठेवण्याचा मानस डॉ. पाटील यांनी व्यक्त केला आहे. यावर्षी देखील या व्याख्यानमालेचे पुष्प तिन्ही दिवस विद्यावाचस्पती विवेक घळसासी हे गुंफणार आहेेत. मंगळवार (२५) रोजी सायंकाळी ६ ते ८ वाजे दरम्यान पहिले पुष्प अलौकीक योगी अरविंद, बुधवार (२६) रोजी दुसरे पुष्प श्रीरामांनी दिलेला सक्सेस मंत्र, तर गुरूवार (२७) रोजी तिसरे पुष्प आता करोनासह जगायचे या विषयांवर गुंफणार आहेत.
शासनाच्या आखुन दिलेल्या नियमांची काळजी घेत यंदाची ही १५ वसंत व्याख्यानमाला ऑनलाईन आयोजित करण्यात आली आहे. श्रोतृवर्गाने आपापल्या घरी बसून झुम अॅप द्वारे सहभागी होण्याचे आवाहन संयोजक डॉ. पाटील यांनी केले आहे.