पेठ – सिंचन आणि विविध कारणांसाठी वळण बंधारे बांधण्याच्या योजना हाती घेतल्या जात असल्या तरी त्यामुळे धरणांवरील पाणीसाठ्यावर परिणाम होत आहे. पावसाचे माहेरघर असलेल्या पेठ तालुक्यातील ९ पैकी ६ धरणेच पूर्ण भरली असल्याचे चित्र आहे.
तालुक्यातील जवळपास सर्वच नद्या पाश्चिम वाहिनी आहेत. लघु पाटबंधारे बांधकाम विभाग अंतर्गत ९ लहान-मोठे प्रकल्प तालुक्यात आहेत. त्यामध्ये लिंगवणे, आड बु., हरणगाव, शिंदे, चोळमूख, श्रीमंत(गावंधपाडा) पाहूचीबारी, इनामबारी, शिराळे आदींचा समावेश आहे. ऑगष्ट अखेर लिंगवणे, शिंदे, चोळमूख, पाहूचीबारी, इनामबारी व शिराळे हे प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरले आहेत.
वळण योजनांचा परिणाम
गुजरात राज्याकडे वाहून जाणारे पावसाचे पाणी अडवून ते पूर्ववाहिनी नद्यांद्वारे दिंडोरी तालुक्यातील वाघाड धरणात वळवण्यासाठी पेठ व दिंडोरी तालुक्याच्या सीमेवर घाटाच्यावर वळण योजना राबवण्यात आली. यामुळे घाटमाथ्यावरून खाली वाहणारे पाणी अडवले गेले. याच पाण्यावर दरवर्षी वाघाड धरणाचा जलसाठा वाढत असतो. मात्र या वळण योजनेमुळे आड बु., हरणगाव, श्रीमंत या धरणाच्या जलसाठ्यात घट निर्माण झाली आहे. यंदा पर्जन्यमानातही मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. सप्टेंबर महिना सुरु झाला तरी पावसाने सरासरी गाठलेली नाही. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाईचा धोका निर्माण झाला आहे. ऑगष्ट अखेर तालुक्यात केवळ १४६४ मिमी पाऊस पडला आहे.
तालुक्यातील धरणांची क्षमता आणि सध्याचा साठा असा (आकडेवारी द.ल.घ. फू. मध्ये)
१) लिंगवणे -६५.६२ (६५.६२)
२) आड-५८.२१ (३३.५२)
३)हरणगाव -१८१.४० (१४४.३७)
४) शिंदे -४३.०४ (४३.०४)
५) चोळमूख -१४०.२७ (१४०.२७)
६) श्रीमंत(गावंधपाडा) – ३९९.१२ (२५६.८४)
७) पाहूचीबारी -५५.३९ (५५.३९)
८) इनामबारी -८७.१४ (८७.१४)
९) शिराळे -६७.०३ (६७.०३)