मुंबई – शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात चौकशीसाठी हजर झाल्या आहेत. त्यांना चौकशीसाठी उद्या (५ जानेवारी) रोजी बोलविण्यात आले होते. मात्र, त्या आदल्या दिवशीच म्हणजे आजच हजर झाल्या आहेत. दरम्यान, शिवसैनिकांनी ईडी कार्यालयाबाहेर मोठी गर्दी केल्याने पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
वर्षा राऊत यांना समर्थन देण्यासाठी आम्ही येथे जमल्याचे शिवसैनिकांकडून सांगितले जात आहे. तर, जमावबंदी नोटिस पोलिसांनी काढली आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांची चौकशी केली जाणार आहे. राऊत यांनी ५५ लाख रुपयांचे व्यवहार पीएमसी बँकेतून केले होते. ते पैसे कुठून आले, त्या पैशांचे काय झाले आदींबाबत ईडी चौकशी करणार आहे.