मुंबई – २०२० हे वर्ष तसे काही फारसे सुखावह गेले नाही. कोरोनाचा कहर सगळ्यांनाच भारी पडला. आता किमान या वर्षातला शेवटचा वीकेंड तरी चांगला जावा, यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्म्स सज्ज आहेत.
चित्रपट
कोरोनाच्या त्रासामुळे अनेक बिग बजेट चित्रपट यंदा ओटीटीवर रिलीज झाले. २५ ऑक्टोबर म्हणजेच नाताळच्या दिवशी प्राईम व्हिडिओवर ‘कुली नंबर 1’ प्रदर्शित होणार आहे. 1995 मध्ये आलेल्या गोविंदा आणि करिष्मा कपूर यांच्या चित्रपटाचा हा रिमेक आहे. डेव्हिड धवन दिग्दर्शित या चित्रपटात वरून धवन आणि सारा अली खान मुख्य भूमिकेत आहेत. या रिमेकमध्ये मूळ चित्रपटातल गाणी देखील रिमेक करून घेतली आहेत. 2020 मध्ये प्रदर्शित होणारा हा अखेरचा बॉलिवूड चित्रपट आहे.
नेटफ्लिक्सवर 24 तारखेला एके v/s एके हा अनिल कपूर आणि अनुराग कश्यप मुख्य भूमिकेत असलेला चित्रपट रिलीज झाला. हा चित्रपट रिऍलिटी बेस्ड थ्रिलर आहे. म्हणजे चित्रपटाची गोष्ट काल्पनिक असली, तर यात काम करणारे सगळे कलाकार आपल्या प्रत्यक्ष आयुष्यातील भूमिका त्यात साकारत आहे. विक्रमादित्य मोटवाने यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
नेटफ्लिक्सवरच 23 तारखेला ‘द मिडनाईट स्काय’ प्रदर्शित झाला आहे. प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता जॉर्ज क्लूनी याने याचे दिग्दर्शन केले असून मुख्य भूमिकेतही तोच आहे. हा एक सायन्स फिक्शन सिनेमा आहे.
वेबसिरीज
डिस्नी प्लस हॉटस्टारवर 24 तारखेला ‘क्रिमिनल जस्टीस, बिहाईंड क्लोज्ड डोअर्स’ ही सिरीज रिलीज झाली आहे. यात पंकज त्रिपाठी आपल्या माधव मिश्राच्या भूमिकेत परतले आहेत. याशिवाय कीर्ती कुल्हरी, जिशू सेनगुप्ता, दीप्ती नवल, आशिष विद्यार्थी प्रमुख भूमिकेत आहेत.
एमएक्स प्लेयरवर 25 तारखेला ‘द मिसिंग स्टोन’ ही मिनी सिरीज रिलीज होत आहे. यात वरूण सोबती आणि बिदिता बाग मुख्य भूमिकेत आहेत.
सोनी लिव्हवर ‘सॅंडविच फॉरेव्हर’ 25 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. हा कॉमेडी शो केवळ 15 भागांचा आहे. रोहन सिप्पी याचे दिग्दर्शक आहेत. आहना कुमरा, कुणाल रॉय कपूर, दिव्या शाह, अतुल कुलकर्णी आदी प्रमुख भूमिकेत आहेत. तर ‘द कपिल शर्मा शो’ चे लेखक भरत कुकरेती या शोचे लेखक आहेत.