नाशिक – उत्तर महाराष्ट्रात वर्षभरामध्ये झालेल्या लाचलुचपत विभागाच्या कारवाईत वर्ग ३चे सर्वाधिक अधिकारी लाच घेताना सापडले आहेत. तर, यंदाही पोलिस आणि महसूल विभागाने लाच घेण्याच्या बाबतीत आपला अव्वल क्रमांक कायम ठेवला आहे. तशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कडासने म्हणाले की, यंदा झालेल्या कारवाईच्या वर्गवारीत तब्बल ७६ वर्ग ३ चे अधिकाऱ्यांनी लाचखोरीत अव्वल नंबर पटकावला आहे. त्यापाठोपाठ १३ वर्ग दोन,९ वर्ग १चे अधिकारी गळाला लागले असून इतर लोकसेवक व खासगी व्यक्ती अश्या २४ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
कारवाईचे शतक
लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या नाशिक कार्यालयाने यंदाही धडाकेबाज कामगिरी केली असून, कारवाईत राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. कोविड -१९ मुळे यंदाची कारवाई थंडावली असली तरी परिक्षेत्रात या विभागाने सापळा कारवाईचे शतक ठोकले आहे. वर्षभरात १३३ लाचखोरांना एसीबीने बेड्या ठोकल्या असून, त्यात नगर जिह्यात सर्वाधिक ३२ सापळे तर नाशिकमध्ये २७ सापळे यशस्वी झाल्याचे कडासने यांनी स्पष्ट केले.
लॉकडाऊन असूनही संख्या घटली नाही
सन २०२० चे प्रारंभीचे तीन महिने वगळता संपूर्ण वर्ष कोरोना महामारीत गेले आहे. मार्च महिन्यात कोविड-१९ मुळे लॉकडाऊन जाहिर करण्यात आल्याने शासकीयसह खासगी यंत्रणा ठप्प झाली होती. एकूणच शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्याही रोडावली होती, तरीदेखील या वर्षभरात नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदूरबार, जळगाव अशा पाच जिल्ह्यात १०० सापळे यशस्वी करण्यात आले. तर अपसंपदेचे चार गुन्हे दाखल करण्यात आले असून या प्रकरणांमध्ये १३३ लाचखोरांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यात लोकसेवक आणि खासगी इसमांचा समावेश आहे, असे कडासने यांनी सांगितले.
१९ गुन्ह्यांची घट
गेल्या वर्षी १२३ गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्या तुलनेत यंदा १९ गुह्यांची घट झाल्याचे दिसून येते. लाचखोरीत सालाबादाप्रमाणे यंदाही पोलीस आणि महसूल विभाग अव्वलस्थानी असून परिक्षेत्रात महसूलच्या २६ आणि २४ पोलीसांवर कारवाई करण्यात आल्याचे कडासने म्हणाले.