मुंबई –सगळे जग विचित्र परिस्थितीला सामोरे जात असताना आणि आपले आयुष्य मास्क आणि घरात बंदिस्त झालेले असताना कोरोनाने आपल्याला काय शिकवले असा विचार आपण केला तर कोरोनाने उद्याच्या गोष्टींची आज आपल्याला ओळख करून दिली. उद्याचे जग, उद्याची माध्यमे, उद्याचे शिक्षण कसे असेल याची आजच जाणीव करून दिली. त्यामुळे एक पाऊल आत्मविश्वासाने पुढे टाकताना महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या या पिढीला पुढचे स्वप्नं काय असेल हे केवळ दाखवले नाही तर ते स्वप्न आजच प्रत्यक्षात आणले, जी स्वीट आणि गुगल क्लासरुमच्या माध्यमातून असे पाऊल टाकणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले असून त्यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
वर्क फ्रॉम होमसाठी सहकार्य करावे – मुख्यमंत्री
जे शिक्षक या तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन उपक्रमात सहभागी झाले त्यांचेही मी अभिनंदन करतो असे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, गुगलमुळे हे शक्य झाले असून भावीकाळात वर्क फ्रॉम होमची संकल्पना यशस्वीपणे राबविताना उपलब्ध तंत्रज्ञानाचा अधिकाधिक चांगला उपयोग कसा होऊ शकेल यासाठीही गुगलने सहकार्य करावे. मुख्यमंत्र्यांनी गुगल क्लासरुम आणि गुगल स्वीट च्या माध्यमातून शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छाही दिल्या. ते म्हणाले की गुगलच्या सहकार्याने आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राज्यातील सर्व भागातील विद्यार्थ्यांची शिक्षण प्रक्रिया सुरुळित सुरु होण्यास यामुळे मदत होईल.
शिक्षणातील अग्रेसर राज्य बनविणार
सर्वसामान्यांपर्यंत शिक्षण पोहचविण्यासाठी आणि शिक्षणातील दरी कमी करण्यासाठी इंटरनेटच्या सामर्थ्याचा वापर करुन,ऑनलाईन संसाधने, प्लॅटफॉर्म, बँडविड्थ आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन महाराष्ट्राला शिक्षणातील सर्वात प्रगतीशील राज्य बनविण्याचे आमचे लक्ष्य आहे, असे शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले. जी स्वीट फॉर एज्युकेशन आणि गुगल क्लासरूम सारखे विनामूल्य प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिल्याबद्दल आणि या परिस्थितीशी जुळवून घेत विद्यार्थ्यांना शिकण्यास मदत करत असलेल्या सर्व शिक्षकांचे प्रा. गायकवाड यांनी यावेळी आभार मानले. आतापर्यंत सुमारे दीड लाख शिक्षकांनी या माध्यमाचा वापर करण्यासाठी रजिस्ट्रेशन केले असल्याचेही त्या म्हणाल्या. गुगल सोबत शिक्षण क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाच्या वापरासंबधी दीर्घकालीन भागीदारीची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
३२ कोटी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड
कोविड विषाणुच्या प्रादुर्भावामुळे देशातील सुमारे ३२ कोटीहुन अधिक मुलांच्या शिक्षणात खंड पडला आहे असे सांगुन गुगलचे भारतातील विक्री प्रमुख आणि उपाध्यक्ष संजय गुप्ता म्हणाले, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन देण्यास गुगल कटीबद्ध असून राज्यासोबत सुरु झालेली ही भागीदारी भविष्यात अधिक समृद्ध होईल. जी स्वीट इंटरनेटद्वारे दिली जाणारी माहितीचा शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. विद्यार्थ्यांचे शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये यासाठी राज्य शासन करित असलेले प्रयत्न निश्चितच प्रशंसनिय आहेत असेही ते म्हणाले.
ठळक बाबी
• शिक्षणासाठी जी स्वीट : जीमेल, डॉक्स आणि ड्राइव्ह तसेच क्लासरूमसह परिचित संप्रेषण आणि सहयोग साधनांचा विनामूल्य संच. हे कोठेही, केव्हाही आणि डिव्हाइसच्या श्रेणीवर शिकण्यास सक्षम करते.
• गूगल क्लासरूम : जी स्वीट फॉर एज्युकेशन मधील एक सोपं पण शक्तिशाली साधन, जे शिक्षकांना सहजपणे असाइनमेंट तयार करण्यास, पुनरावलोकन करण्यास आणि आयोजित करण्यात मदत करते, तसेच वर्गात किंवा दूरस्थ शिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यास मदत करते.
• गूगल फॉर्म : एक सोपा प्रश्न आणि प्रतिसाद साधन जे शिक्षकांना क्विझ आणि चाचण्या लवकर तयार करण्यासाठी प्रश्न भरण्यास किंवा आयात करण्यास अनुमती देते.
• असाइनमेंट्स : एक असे साधन जे शिक्षकांना लवकर आणि सुरक्षितपणे तयार करण्यास, विश्लेषण करण्यास आणि ग्रेड कोर्सवर्क करण्यास आणि विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये अधिक लवचिकता प्रदान करण्यास अनुमती देते.