अहमदाबाद – भारत आणि इंग्लंड यांच्यातील आगामी तीन सामन्यांची वनडे मालिका पुण्याऐवजी आता अहमदाबादला होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला जाण्याची चिन्हे आहेत.
बीसीसीआयच्या निर्णयानुसार क्रिकेट मालिकेतील भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा डे-नाईट कसोटी सामना अहमदाबादमधील नव्याने बांधलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. आता चौथा सामनाही अहमदाबादमध्ये होणार आहे, त्यानंतर दोन्ही संघांमधील तीन सामन्यांची टी-२० मालिकादेखील येथे खेळली जाणार आहे.
बीसीसीआयशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, कोरोनामुळे जर परिस्थिती बिघडली तर दोन्ही संघांमधील एकदिवसीय मालिका अहमदाबादमध्येही होऊ शकते. कारण दोन्ही संघाला प्रवास करावा लागणार नाही. तसेच प्रेक्षक स्टेडियमवर येऊ शकतील. तसेच कसोटीनंतर अहमदाबादमध्ये एकदिवसीय सामने आयोजित करायचे असतील तर गुजरात क्रिकेट असोसिएशनला यासाठी जास्त अतिरिक्त तयारी करावी लागणार नाही.
तथापि, सध्याच्या नियोजनानुसार तीनही एकदिवसीय सामने पुणे शहराच्या हद्दीवरील एमसीए स्टेडियमवर २३, २६ आणि २८ मार्च रोजी खेळले जाणार आहेत. परंतु एमसीएने म्हटले आहे की, महाराष्ट्रातील कोविडच्या वाढत्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता प्रेक्षकांशिवाय या सामन्यांना मान्यता देण्यासंबंधी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर निर्णय घेण्यात आला.
भारत-इंग्लंड यांच्यात एकदिवसीय सामने आयोजित करण्यासाठी एमसीएचे अध्यक्ष विकास काकतकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह सुकाणू परिषदेचे अध्यक्ष मालिंद नार्वेकर यांची भेट घेतली, असल्याचे क्रिकेट संघटनेचे म्हणणे आहे.