नाशिक – वन्य प्राणी हे एखाद्या वेळी चुकून पाण्याच्या किंवा भक्ष्याच्या शोधात नागरी वस्त्यांमध्ये येतात. अशावेळी मानव-वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी ११ डिसेंबर ते 8 फेब्रुवारी या कालावधीत मनाई आदेश लागू केले आहेत. या आदेशाची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यासाठी वनविभागाने नागरिकांमध्ये जनजागृती करावी, अशा सुचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी वनविभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच, मानवी वस्त्यांमध्ये वन्यप्राणी आढळल्यास १९२६ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात मानव-वन्यप्राणी संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याबैठकीसाठी नाशिक पुर्व भागाचे उप वनसंरक्षक तुषार चव्हाण, नाशिक पश्चिम भागाचे उप वनसंरक्षक पंकज कुमार गर्ग यांच्यासह वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. मांढरे म्हणाले, वन्य प्राणी हे एखाद्या वेळी चुकून पाण्याच्या किंवा भक्ष्याच्या शोधात नागरी वस्त्यांमध्ये येतात. या वन्य प्राण्यांना पाहण्यासाठी नागरीक घटनास्थळी गर्दी करतात आणि त्या ठिकाणी सेल्फी अथवा फोटो काढणे, इकडे-तिकडे पळणे अशा नागरीकांच्या कृत्यामुळे नागरी वस्तीत आलेले वन्यप्राणी बिथरून हिंस्त्र होऊन विघातक परिस्थिती निर्माण होत असते. अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी मानव-वन्यप्राणी संघर्ष टाळण्यासाठी जिल्ह्यात घरोघरी जावून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात यावी. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमातून शहरी व ग्रामीण वस्त्यांत वन्यप्राणी आल्यास कोणती काळजी घ्यावी, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन करण्यात यावे आणि या विद्यार्थ्यांना वन्यप्राणी दूत बनवून त्यांच्यामार्फत पालकांमध्येही वन्यप्राण्यांबाबत जनजागृती करण्यात यावी, असे जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी बैठकीत सांगितले आहे.
वन्यप्राणी मानवी वस्तीत आल्यास स्थानिक नागरिकांच्या वर्तनामुळे विघातक परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे वन्यप्राण्यास पकडण्यासाठी आलेल्या बचाव पथकास अडथळे निर्माण होत असतात. यासाठी वनविभाग, महानगरपालिका, पोलीस यंत्रणा, पशुवैद्यकीय अधिकारी, शोध व बचाव पथकाचे जवान, संबंधित शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी आणि त्याक्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती यांच्या बचाव पथकास नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन ही जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी यावेळी केले आहे.
शहरी व ग्रामीण भागातील मानवी वस्त्यांमध्ये वन्यप्राणी आढळून आल्यास वनविभागाचा १९२६ हा टोल फ्री क्रमांक व या कामासाठीचे पथक २४ तास नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे, अशी माहिती नाशिक पश्चिम भागाचे उप वनसंरक्षक पंकज गर्ग यांनी बैठकीमध्ये दिली आहे.