खरा ‘दादा’ माणूस!
वनाधिपती विनायक दादा पाटील यांचा आज दशक्रिया विधी आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या आठवणींना अभिजीत साबळे याने दिलेला हा उजाळा…..
14 सप्टेंबर 2020 दुपारी 12 वाजेच्या दरम्यान दादांचा फोन आला. अरे बाबा…मला गेल्या वेळी तू जे जे मसाले आणि चटण्या दिल्या होत्या ते सर्व पुन्हा घेऊन ये मुलीला चटण्या फार आवडल्या…मी दादांना म्हटलं की उद्या लगेच देतो आणि सध्या आवळ्याचा सिजन सुरु आहे तर मुरांबा आणि आवळा कँडी घरी बनवलेली आहे ती सुद्धा घेऊन येतो..दादा मिश्किल पणे म्हणाले अरे बाबा….आवळा जवान पोरांनी खावा रे…मी आवळा खाल्ला तर मी अजूनच जवान होईल तर मग…थोडा वेळ फोन वरच हश्या पिटला…घेऊन ये दादा म्हणाले…आणि ऐक रे ती लसूण आणि बाकी काय घातलेलं मला माहित नाही ती एक चटणी घेऊन ये माझी तर झांजच उतरली…कानातून धूर… नाका डोळ्यातून पाणी येई पर्यंत खाल्ली चवीला मस्त होती. जेव्हा येशील तेव्हा घेऊन ये…मी दादांना होकार देत…दादांनी फोन ठेवला…
दुसऱ्या दिवशी मंगळवार 15 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी दादांकडे सर्वच पदार्थ घेऊन गेलो दादा- ये ये अभिजीत… सगळ्या पदार्थांच्या बरण्या माझ्या हातातच होत्या. ते बघत दादांनी लगेच आवाज दिला…तुळसा…हे अभिजीत ने आणलेल्या सर्व बरण्या बाहेरुन सॅनिटाईज करुन आण आणि परत इथं टेबलावर ठेव….तुळसा मावशी परत येई पर्यंत हे सर्व कुठे/कसं/कोण-कोण/आणि किती लोक बनवता…कच्चा माल कुठून आणता?मार्केटिंग कशी करतो? या विषयावर चर्चा सुरु होती. तुळसा मावशींनी सर्व बरण्या आणून टेबलावर ठेवल्या आणि दादांनी तुळसा मावशींना सांगितलं चहा घेऊन या…आणि मग दादांनी माझ्या कडून हे सर्व पदार्थ कसे बनवले? काय काय घातले? प्रमाण किती हे सर्व विचारून त्यांनी स्वतः लिहून घेतलं आणि चहा घेऊन आलेल्या तुळसा मावशींना सांगितलं की हे सगळं घरी बनवून बघा आणि काही आडलंच तर अभिजीत ला विचारा…
मी म्हटलं दादा काही प्रमाण कमी जास्त झालं तर माझी आईच त्यांना बरोबर सांगू शकेल मग दादा लगेच उत्तरले आईंना फोन लाव…आणि लगेच बोलणं करुन दे…मी आई ला फोन लावला…हॅलो आई…विनायक दादांना चटणी च्या रेसिपी बाबत तुझ्या सोबत बोलायचं आहे..फोन वरुन आई…ये अरे मी काय बोलू आता त्यांच्या सोबत…मी..अगं आई चटणी ची कशी बनवली त्यातले पदार्थ किती प्रमाणात घातले ते सांग…तेवढ्यात विनायक दादा दे इकडे मी बोलतो…दादांनी मला आईच नाव विचारलं..आणि फोन स्पिकर वर घेतला…हॅलो उमा ताई…विनायक पाटील बोलतोय….फोन वरुन आई…हा दादा बोला ना!
दादा-तुम्ही मला दिलेल्या सर्वच चटण्या खूप चवदार आणि आपल्या निफाडच्या परंपरेने चालत आलेल्या चवीनं भरलेल्या आहे.
फोन वरुन आई खूप धास्तावलेली कारण आई खूप साधी-भोळी ती आणि तिचं काम भलं कधीही इतक्या मोठ्या माणसांसोबत बोलल्याच आठवत सुद्धा नाही ते आज घडत होतं…
दादा फोन कौतुक करत होते आणि आई फक्त शांत ऐकत होती…नंतर दादा म्हणाले बरं उमा ताई…चटण्या कशा बनवल्या ते सांगा म्हणजे आमची तूळसा तसं बनवेल..आई ने सांगायला सुरुवात केली आणि तुळसा मावशींनी ऐकायला.तुळसा मावशी आणि आई चा संवाद पूर्ण झाल्यावर दादांनी आई ला सांगितलं की तुम्ही जे काम करता आहात हे येथून पुढच्या पिढीला नं जमण्यासारख आहे सर्व जुन्या पदार्थांच्या रेसिपी तुम्ही टिकून ठेवल्या आहे याचा मला आनंद वाटतो आणि तुमचं हे सगळं बघता मला माझ्या आई ची आठवण आली त्यामुळे तुम्ही तुमच्या वाटेचा प्रवास सुरु ठेवा…अस म्हणत दादांनी फोन ठेवला.
दादा-अभिजीत तू मला एवढं चवदार रांगड्या गावरान चटण्या दिल्यात तर मी तुला आता माझ्या कडून काही तरी भेट देतो म्हणत दादा मला बाबूल बंगल्याच्या उत्तर दिशेला घेऊन गेले आणि त्यांच्या कडे असलेल्या थायलंड वरुन आणलेल्या चिंचेचे झाड दाखवले आणि आवाज दिला…विनोद…..साबळे पाटलांना 11 चिंचेचे रोपं काढून त्यांच्या गाडीत ठेवून दे बरं… त्यांनतर दादांनी कोकणातून आणलेली बांबूचा कंद भाजीसाठी दिला आणि त्याचे लोणचं सुद्धा दिलं…
गेल्या महिन्यातली ही आठवण माझ्या साठी शेवटची आणि अविस्मरणीय अशी भेट ठरली कधी-कधी समोर उभे ठाकलेल्या मोठ्या प्रसंगांना इग्नोर करणारे दादा आणि इतक्या बारीक-सारीक गोष्टींचा विचार करणारे दादा…या दोन्ही दादांना मी पाहिलंय… माझ्या आजोबांचे मोठे बंधू कै. कारभारी देवराम पा.साबळे त्याकाळी विनायक दादा आणि कारभारी दादा यांच्यातील राजकीय वैर संपूर्ण तालुक्याला ज्ञात होतं… तरी सुद्धा दोघांचे वैयक्तिक संबंध अतिशय दृढ होते.
मी जेव्हा जेव्हा दादांकडे जाई तेव्हा तेव्हा कारभारी दादांचा विषय हमखास निघायाचाच मग दादा त्यांचे जुने किस्से सांगायचे…आणि 2 ते 3 तास कसे निघून जायचे काही समजत नसायचं…दादा म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होत.सर्वच क्षेत्रात रुची बाळगणारे दादा….खऱ्या अर्थाने ‘दादा’ माणूस होते यात शंकाच नाही.
माझ्या पिढीच्या युवकांना दादांकडून शिकण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी होत्या. दादा वयाने 77 वर्षांचे होते मात्र तरी सुद्धा त्यांनी स्वतः मध्ये एका लहान मुलाचा स्वभाव जिवंत ठेवलेला होता.त्यामुळे अगदी 2 वर्षाच्या मुलांपासून ते थेट शरद पवार साहेबांपर्यंत असे सगळेच त्यांचे मित्र होते.अशा अजातशत्रू व्यक्तिमत्वास श्रद्धांजली देताना उर भरुन येतो…
अजूनही विश्वास बसत नाही की दादा आपल्यात नाहीच…जो आवडे लोका,तोची आवडे देवा…असच काही घडलं आणि देवाने दादांना बोलावंण घातलं आणि आपल्याला एकटं करुन दादा कदंबवनाला पोरकं करुन गेले.
तिर्थरुपी दादांना भावपूर्ण आदरांजली!