वाशिम – पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी आरोप होत असलेले शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड प्रथमच बोलले आहेत. त्यांनी आज कुटुंबियांसमवेत पोहरादेवीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना प्रथमच या प्रकरणावर भाष्य केले आहे.
राठोड यांच्या समर्थकांनी पोहरादेवी येथे मोठी गर्दी केली. त्यांच्याकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येत असल्याचेही बोलले गेले. पोलिसांचाही मोठा फौजफाटा येथे तैनात आहे. केवळ ५० जणांना उपस्थितीची परवानगी दिलेली असताना पोहरादेवी येथे मोठी गर्दी जमल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे पोलिस काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राठोड म्हणाले की, या सर्व प्रकरणात अतिशय घाणेरडे राजकारण करण्यात आले आणि येत आहे. यानिमित्ताने सोशल मिडियात माझी आणि बंजारा समाजाची बदनामी केली जात आहे. पुजा चव्हाण यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी, माझे कुटुंब आणि संपूर्ण बंजारा समाज सहभागी आहे. गेल्या ३ दशकापासून मी सामाजिक व राजकीय कार्य मोठ्या प्रमाणात करीत आहे. मला उद्ध्वस्त करण्याचा काही जणांचा कट आहे. आजपर्यंत जे काही सांगितलं किंवा दाखविले गेले त्यात कुठलेही तथ्य नसल्याचे राठोड यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. तसेच, आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.
राठोड पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे चौकशीतून खरे सत्य बाहेर येणार आहे. मी हात जोडून विनंती करतो की कुणीही माझी किंवा माझ्या कुटुंबाची बदनामी करु नये, असे आर्जवही राठोड यांनी केले आहे. आतापर्यंत मी कुठेही गायब नव्हतो. आज मी देवीचे दर्शन घेऊन माझ्या कामाला पुन्हा सुरुवात करीत आहे. सर्वांना सोबत घेऊन यापुढेही काम करणार असल्याचे राठोड यांनी सांगितले.
काय आहे प्रकरण
बीडमधल्या परळीतल्या सोशल मीडियावर प्रसिद्ध पूजा चव्हाण (वय २२) हिनं पुण्यात ८ फेब्रुवारीला इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. पूजा इंग्लिश स्पीकिंग कोर्स करण्यासाठी पुण्यात आली होती. वानवडी इथल्या हेवन पार्कमध्ये ती चुलत भाऊ आणि मित्रासोबत राहात होती. सोशल मीडियामध्ये विशेषतः टिकटॉक अॅपवर ती प्रसिद्ध होती. याप्रकरणी महाविकास आघाडीतले वनमंत्री संजय राठोड यांच्यावर भाजपकडून आरोप झाले. या प्रकरणाबाबत दहा ते बारा ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या. त्यावरून राजकारण चांगलंच तापलं होतं.
चौकशीला सामोरे जाण्याच्या पोहरादेवी पीठाच्या सूचना
सर्व महंतांची बैठक झाली या बैठकीत सर्व प्रकारच्या चौकशीला सामोरे जाण्याच्या सूचना पोहरादेवी पीठाने दिल्या असल्याची माहिती पोहरादेवी येथील जितेंद्र महाराज यांनी दिली. ते म्हणाले की, या प्रकरणात चौकशीतून काही समोर येत नाही तोपर्यंत कुणाला दोषी ठरवणे योग्य नाही. चौकशी झाल्यानंतर दोषी कोण आहे हे समोर येईलच. या प्रकरणाची चौकशी योग्य दिशेने चालु असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.