नाशिक – वणी-नांदुरी रस्त्यावरील पायरपाडा शिवारात भरधाव वेगाने धावणाऱ्या दोन कारमध्ये समोरासमोर भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भयानक होता की त्यात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात एका कारचा चालक जागीच ठार झाला तर दोन्ही कारमधील प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. त्यात लहान मुलांचाही समावेश आहे. जखमींवर वणी येथे प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना नाशिकमधील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश शांताराम शेवाळे (४० रा. मोकभणगी, ता. कळवण) असे अपघातात ठार झालेल्या कारचालकाचे नाव आहे. शेवाळे कुटूंबीय नाशिक येथे आले होते. शुक्रवारी (दि.३०) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास स्विफ्ट कारने ( एमएच ४२ एएच ४०१२) आपल्या गावी जात असतांना हा अपघात झाला. वणी नांदूरी मार्गावरील पायरपाडा शिवारात घाटातील वळण रस्त्याचा अंदाज दोन्ही वाहनचालकांना न आल्याने ही घटना घडली.
नांदूरीकडून वणीच्या दिशेने भरधाव येणारी बुराडे कुटूंबियांची टियुव्ही कार (एम एच १५ जीएक्स ३८८३) आणि स्विफ्ट कार मध्ये समोरासमोर धडक झाली. त्यात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. स्थानिकांसह वाटसरूंनी मदत कार्य हाती घेत जखमींना तात्काळ वणी येथे हलविले. माहिती मिळताच वणी पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. जखमींवर वणी ग्रामीण रूग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारार्थ नाशिक येथे हलविण्यात आले असून काहींवर वणी रूग्णालयातच उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अधिक तपास वणी पोलिस करीत आहेत.
जखमींची नावे अशी
स्विफ्ट कारमधील सोनाली योगेश शेवाळे (वय ३५), भिमाबाई शांताराम शेवाळे (वय ६५), सिद्धार्थ योगेश शेवाळे (वय १४), प्राची योगेश शेवाळे (वय ९), सुमित नानाजी बच्छाव (वय २५ रा. सर्व मोकभणगी) तर टियुव्ही कारमधील योगेश रामनाथ बुराडे (वय ३४), सुप्रिया योगेश बुराडे (वय २९), स्वानंदी योगेश बुराडे, (वय २.५),अथर्व मधुकर सहाणे ( वय १४), नचिकेत योगेश बुराडे ( वय ५) ओमकार महाले (वय २४) अशी जखमींची नावे आहेत.