कळवण – सप्तशृंग गडावर श्री भगवती दर्शनास सोमवारपासून पास सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. नांदुरी – घाट रस्त्या दरम्यान असलेल्या कमानी जवळील बंद पडलेल्या टोल प्लाझा येथे प्रत्येक दर्शनार्थी भाविकांना (सर्व वाहन प्रकारानुसार प्रत्येकी वाहनानुसार निर्धारीत संख्येने) कार्यान्वित करण्यात आली आहे.
कोविड – १९ संदर्भीय योग्य त्या खबरदारीसह भाविकांची श्री भगवती दर्शन संदर्भीय नियंत्रित व सुरक्षित प्रक्रिया विश्वस्त संस्थेच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२० पासून कार्यान्वित केले असून निर्धारीत केलेल्या नियोजना प्रमाणे प्रति ताशी ३६० (पायी मार्गे २४० व रोपवे मार्गे १२०) प्रमाणे प्रति दिवशी ५ हजार ७५० भाविकांची दर्शन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार गेल्या सात दिवसात कोणतीही अडचण न उद्भवता शासकीय सर्व सुचनांचे तंतोतंत पालन करून एकूण ४६ हजार ८७६ भाविकांनी सामाजिक अंतर व कोविड-१९ संदर्भीय सेवा-सुविधेच्या पूर्ततेसह श्री भगवती दर्शन सुरक्षितपणे घेतले आहे. प्रति दिवशी सरासरी दर्शनाची एकूण ६६९६ प्रमाणे भाविकांना उपलब्धता झाली आहे. सदर दर्शन सुविधा सुरक्षित व अबाधित ठेवणेकामी तसेच भाविकांची संभाव्य अचानक होणाऱ्या गर्दीला योग्य नियोजनासह नियंत्रित करणेकामी विश्वस्त संस्थेच्या वतीने ऑनलाईन कार्यान्वित करण्याच्या नियोजनात कार्यरत असून येणाऱ्या भाविकांचा शैक्षणिक स्तर, तंत्रज्ञान संदर्भीय अद्यावत माहिती, यंत्र व तंत्रज्ञानाची उपलब्धता आदींची ऑनलाईन दर्शन पास प्रक्रियेत अडसर होवू नये म्हणून प्राथमिक स्तरावर विश्वस्त संस्थेने मौजे नांदुरी येथे ऑफलाईन दर्शन पास प्रक्रिया कार्यान्वित केली आहे.
सदर ऑफलाईन दर्शन पास प्रक्रियेत भाविकांचे नाव, संपर्क क्रमांक, भाविक संख्या, नोंदणी वेळ व संभाव्य दर्शनाची संधी (वेळ) तसेच थर्मल गनचा वापर करून भाविकांच्या शरीराचे तापमान तपासून त्यांना श्री भगवती मंदिर दर्शन पास देणे बाबतची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सदर दर्शन पास हा पायी मार्गे व रोपवे माध्यमातून मंदिरात जाणाऱ्या भाविकांना प्राप्त करून घेणे बंधनकारक आहे. फक्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या माध्यमातून गडावर येणा-या भाविकांसाठी विश्वस्त संस्थेचे रोपवे कार्यालय व पहिली पायरी येथील देणगी कार्यालयात सदर दर्शन पास उपलब्ध करून दिला जाणार आहे. मात्र त्यासाठी भाविकाला प्रवास मार्गाचे तिकीट संबंधित कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे.
विश्वस्त संस्थेच्या वतीने कोविड-१९ संदर्भीय जनजागृती व प्रबोधन हेतूने १ मार्च २०२० रोजी कोरोना विषाणू संसर्ग – आरोग्य जनजागृती अभियान कार्यान्वित करून टाळेबंदी व मिशन बिगेन अगेन दरम्यान सदर उपक्रमा अंतर्गत प्रशासकीय महसूल, पोलिस, आरोग्य विभागाला तसेच विश्वस्त संस्थेच्या सर्व कर्मचारी वर्गाला सॅनिटायझर, मास्क, हॅण्डग्लोज, फेसशिल्ड व विटामिन सी व अर्सेनिक अल्बम – ३० आदी उपलब्ध करून दिले. यासह स्थानिक ग्रामस्थांना धर्मार्थ रुग्णालय अंतर्गत मोफत उपचार, रुग्णवाहिका सेवा तसेच स्थानिक गरजवंत ग्रामस्थ व परप्रांतीय मजुरांसाठी मोफत अन्नदान, पशु-पक्षी व वन्य प्राण्यांसाठी धान्य, फळे व पाणी उपलब्ध करून दिले असून, मुख्यमंत्री सहाय्यता निधी – कोविड – १९ साठी विश्वस्त संस्थेने रुपये २१ लाख जमा केले आहे. सदर उपक्रमातील काही पूर्तता अद्याप सुरु असून त्या अंतर्गत सद्यस्थितीत भाविक, ग्रामस्थ, कर्मचारी वर्ग यामध्ये कोविड-१९ संदर्भीय प्रबोधन फ्लेक्स, माहितीपत्रके आदी मार्फत करण्यात येत असून विविध ठिकाणी सॅनिटायझर, हंड्वॉश, हातपाय धुण्याची जागा, सामाजिक अंतर ठेवणेकामी चिन्हाकित जागा यादी सह नियोजन केलेले आहे.
दर्शनासााठी पहाटे ५ ते रात्री ९ वाजेचे दरम्यान वेळेचे नियोजन
कोविड-१९ संदर्भीय संसर्ग टाळणेकामी प्रशासनाने नांदुरी येथे निर्धारीत केलेल्या ठिकाणी श्री भगवती दर्शन पास संदर्भीय नोंदणी व त्या अनुषंगिक पूर्तता करणाऱ्या कर्मचारी वर्गाला योग्य ते सहकार्य देवून आपला दर्शन पास प्राप्त करूनच श्रीक्षेत्र सप्तशृंगगड येथे येण्याचे करावे जेणे करून आपणास कोविड-१९ संदर्भीय सर्व शासकीय आदेशाचे तंतोतंत पालन करून सुरक्षित व गर्दी विरहीत दर्शन सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होईल. तसेच पहाटे ५ ते रात्री ९ वाजेचे दरम्यान आपल्या वेळेचे नियोजन करून भगवतीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा. जेणे करून एकाच वेळी होणारी गर्दी व दर्शन प्रक्रियेतील दिरंगाई टाळणे शक्य होईल. तसेच मंदिर प्रशासनाला निर्धारीत केलेली दर्शन रांगेची / चिन्हाकिंत जागेची शिस्त अबाधित ठेवून सामाजिक अंतर पाळा, मास्क व सॅनिटायझरचा योग्य वापर करा. बाह्य वस्तू व चेहऱ्याला स्पर्श करू नका. आई साहेबांचा आशिर्वादा सोबत आपल्या आरोग्याची आणि कुटुंबाची काळजी घ्या…!
– सुदर्शन दहातोंडे , व्यवस्थापक, श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगगड