दिंडोरी : तालुक्यातील वणी येथील ग्रामिण रुग्णालयात ऑक्सिजनची सुविधायुक्त अतिरिक्त नवीन कोविड कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मात्र कक्षास आॉक्सिजन पुरवठ्यासाठी ऑक्सिजन सिलेंडर (स्टोरेज सिलेंडर) बसवलेला नसल्याने कोविड कक्ष कार्यान्वीत होवू शकलेला नसल्याने तालुक्यातील कोविड रुग्णांना उपचारासाठी इतरत्र धावाधाव करावी लागत आहे. तरी सदर कक्षास त्वरित ऑक्सिजन सुविधा कार्यान्वित करण्याची मागणी होत आहे. सध्या ट्रामा केअर मध्ये ३० ऑक्सिजन बेडची सुविधा असून सदर अतिरिक्त केंद्र कार्यन्वित झाल्यास अजून ३० ऑक्सिजन बेड उपलब्ध होणार आहे.
दिंडोरी तालुक्यात कोविड बाधितांची वाढती संख्या चिंतादायक असून दिंडोरी तालुक्यात सध्या वणी ग्रामिण रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरच्या इमारतीत ऑक्सीजन सुविधायुक्त तीस खाटांचा कोविड कक्ष सुरु आहेत. तर बोपोगाव येथील शासकिय आश्रमशाळेत सर्वसाधारण कोविड कक्ष सुरु आहेत. मात्र तालुक्यातील कोरोना बांधीतांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने हे कोविड कक्ष अपूरे पडत आहेत. विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मागील आठवड्यात दिंडोरी पेठ तालुक्यातील आरोग्य विभागाचा तसेच कोरोना रुग्णसंख्या याबाबत शासकीय अधिकाऱ्यांची दिंडोरी येथे आढावा बैठक घेवून कोविड कक्षातील बेड वाढविणे बाबत कार्यवाही करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.
दरम्यान ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून आरोग्य विभागाने वणी येथील ग्रामिण रुग्णालयाची पाहाणी करुन रुग्णालयाच्या जनरल कक्षात नव्याने ऑक्सिजन सुविधायुक्त तीस खाटांचा कोविड कक्ष सुरु करण्याबाबत निर्णय घेत त्याबाबत त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते. यासाठी कक्षात बेडसह ऑक्सिजन पुरवठा करणारी पाईप लाईन व अन्य पायाभूत व्यवस्था पूर्ण केली आहे. मात्र ऑक्सिजन साठवण्यासाठी ऑक्सिजन सिलींडर टँक बसवण्यात आलेले नसल्याने सदर कोविड कक्ष कार्यान्वीत होवू शकलेला नाही. तालुक्यातील कोरोना बाधितांची रुग्णांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याने जिल्हृाच्या ठिकाणी व अन्य खाजगी रुग्णालयात धावाधाव करावी लागत असून सध्याची नाजुक स्थिती लक्षात घेता तातडीने ऑक्सिजन सिलींडर बसवून ऑक्सीजन पूरवठा करुन वणी येथील नवीन कोविड कक्ष कार्यान्वीत करण्याची मागणी रुग्णांचे नातेवाईक व नागरिक करीत आहेत.
दिंडोरीत ऑक्सिजन व्हेलटीनेटर सुविधेचे कोव्हिडं हॉस्पिटल सुरू करण्याची गरज
दिंडोरी तालुक्यातील वणी येथील ट्रामा केअर सेंटर मध्ये ऑक्सिजन बेड ची सुविधा कोव्हिडं रुग्णांच्या उपचारासाठी करण्यात आली आहे. मात्र येथे व्हेलटीनेटर नसल्याने रुग्णांची गैरसोय होत असून रुग्णांची तब्बेत खालावल्यास रुग्णांना खाजगी दवाखान्यात बेड साठी शोधाशोध करावी लागत असून वेळीच व्हेलटीनेटर न मिळाल्याने काही रुग्णांना प्राण गमवावे लागत आहे. त्यामुळे येथे व्हेलटीनेटर बेड उपलब्ध करण्याची मागणी होत आहे. तसेच दिंडोरी हे तालुक्याचे ठिकाण असून येथे सुसज्ज कोव्हिडं हॉस्पिटल सुरू करण्याची गरज असून त्यात ऑक्सिजन व्हेलटीनेटर बेड सिटी स्कॅन आदी सुविधांसह हॉस्पिटल व्हावे अशी मागणी होत आहे.