नाशिक – वडाळा-पाथर्डी रोडवरील मेट्रो झोन या वसाहतीजवळ गॅरेज चालकाचा खुन झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रो झोन वसाहतीच्या समोर श्रीजी प्लाझा अपार्टमेंटजवळ श्री गुरुकृपा गॅरेज आहे. येथे वाहने दुरुस्ती व वॉशिंगसाठी येतात. गॅरेजमधील कर्मचारी आकाश पवार हा गुरुवारी (१२ नोव्हेंबर) सकाळी दहा वाजेच्या सुमारास गॅरेजमध्ये आला. त्याने दरवाजा उघडून आत पाहिले असता मोबाईल तुटलेल्या अवस्थेत आढळला. तसेच, गॅरेज चालक रामचंद्र राम पराग निसाद (४०, मूळ राहणार उत्तर प्रदेश, सध्या गॅरेजमध्ये मुक्कामाला) हा मृतावस्थेत आढळला. त्याचे डोकेही फुटलेले होते. पवार याने तत्काळ याची माहिती गॅरेजचे भागीदार तंबी व शेजारील दुकानदारांना कळविले. तसेच, इंदिरानगर पोलिसांनाही फोनद्वारे कळविण्यात आले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर घटनास्थळी दाखल झाले.
निसाद याचा बुधवारी (११ नोव्हेंबर) रात्र ते गुरुवारी सकाळी या दरम्यान हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. अज्ञात व्यक्तीने डोक्यात हत्याराने मारून निसादचा खून केल्याचा संशय आहे. भागीदार मुरूवान तंबी (४४) यांनी याप्रकरणी इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.
कारची चोरी
आरोपींनी गॅरेजमधील व्हर्ना ही कार लंपास केल्याची बाब समोर आली आहे. निसादचा खुन आर्थिक कारणांवरुन झाला की चोरीच्या बहाण्याने याचा तपास पोलिस करीत आहेत. वडाळा-पाथर्डी रोडवरील तसेच टोलनाक्यांवरील विविध सीसीटीव्ही फुटेजद्वारे पोलिस तपास करीत आहेत.