नाशिक – वडाळा नाका परिसरात महालक्ष्मी चाळीत दोन गटात झालेल्या भांडणात एकाचा खून तर एक जण गंभीर जखमी झाले आहे. सोमवारी रात्री ११ वाजता ही घटना घडली. या भांडणात चाकू व चॅापरचा वापर करण्यात आला आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेत आकाश संतोष रंजवे याचा मृत्यु झाला तर करण लोट हा जखमी झाला आहे.
पोलिसांनी या घटनेबद्दल दिलेली माहिती अशी की, वडाळा नाका परिसरात महालक्ष्मी चाळीत रात्री दोन गटात भांडण सुरु झाले. यावेळी विशाल बेनवाल व त्याच्या साथीदारांनी राजू लोट व आकाश संतोष रंजवे यांना `तू मेरी पोलिस को टीप क्यू देता है` अशी विचारणा करुन भांडणाला सुरुवात केली. त्याचवेळी बेनीवाल याच्या बाजूने सतीश टाक, पवन टाक, आकाश टाक, निखिल टाक, अभय बेनवाल, हरिष पवार, मनीष दुलगज व शिवम पवार आले. त्यानंतर हे भांडण वाढले. या घटनेत आकाश संतोष रंजवे यांच्यावर चाकू व चॅापरने वार करण्यात आल्यामुळे त्याचा मृत्यू झाला तर करण लोट हा जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.