पंधरा जुगारींवर कारवाई
नाशिक : बेकायदेशीररित्या जुगार खेळणाऱ्या १५ जुगारींवर मुंबई नाका पोलिसांनी शनिवारी (दि. २३) सायंकाळी कारवाई केली. असिफ गुलाम मुर्तुजा (रा. पखालरोड) व त्यांचे पंधरा साथीदार संशयित आहेत. कारवाईत पोलिसांनी ४० हजार १७० रुपयांची रोकड जप्त केली आहे. शनिवारी सायंकाळी लक्ष्मी कॉम्पलेक्स, वडाळा नाका येथे अंदर बाहर नावाचा जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असताना ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ गेंगजे तपास करत आहे.
—
कोयत्याने वार करत ठार मारण्याचा प्रयत्न
नाशिक : मागील भांडणाची कुरापत काढत कोयत्याने वार करून तरुणास ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. सागर फुलांबर मोरे (रा. संत कबीरनगर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. सागरचा भाऊ सुरज मोरे याने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित प्रकाश अशोक उनव्हणे याच्याविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. २४) दिडच्या सुमारास संशयित प्रकाश याने संतकबीर येथील साई बाबा मंदिर परिसरात असताना मागील भांडणाची कुरापत काढत सागरवर कोयत्याने वार केले. यात सागरचे डोके व मानेवर दुखापत झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी संशयित प्रकाशला ताब्यात घेतले असून सहायक पोलीस निरीक्षक एन. व्ही. बैसाणे तपास करत आहे.
—
तडीपारीच्या आदेशाचे उल्लघंन
नाशिक : तडीपारीचे आदेश झुगारून शहरात वास्तव्य करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी संबधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पहिल्या घटनेत सातपूर पोलिसांनी संशयित अजय महादू मोरे (रा. अशोकनगर, सातपूर) यास बस स्टॉप परिसरातून शनिवारी (दि. २३) ताब्यात घेतले. अजयला सहा महिन्यांकरिता शहरातून हद्दपार करण्यात आले असताना पुर्व परवानगीशिवाय तो शहरात आढळून आल्याने पोलिसांनी कारवाई करत सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
दुसऱ्या घटनेत अंबड पोलिसांनी ऋषिकेश अशोक राजगीरे (रा. चुंचाळे शिवार) यास ताब्यात घेतले. ऋषिकेशला दोन वर्षांकरिता शहरातून हद्दपार करण्यात आले असतानाही तो शहरात आढळून आला, यावेळी त्याच्याकडे बेकायदेशीररित्या बाळगलेली ५०० रुपये किंमतीची तलवार मिळून आली. याप्रकरणी शिपाई योगेश सानप तपास करत आहे.