विष्णू थोरे, चांदवड
मनमाड चांदवडच्या रस्त्याच्या राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी मिळाल्यानंतर रस्त्यांच्या दुतर्फा चांदवडची ओळख असणाऱ्या शेकडो वडाच्या झाडांची कत्तल केली जात आहे. गेली अनेक वर्षे चांदवडच्या सौंदर्यात भर घालणारी कितीतरी जुनी वडाची झाडे आता विजेची करवत फिरवल्याने परागंदा होत आहेत.
नेहमी डोळ्यांना हर्ष देणारी झाडे डोळ्याआड झाल्यानंतर गाव आणि रस्ते भकास वाटू लागले आहेत. पर्यावरण प्रेमी असणाऱ्या अनेक नागरिकांमध्ये संतापाची लाट असून भविष्यात अशी झाडे पुन्हा होणार नसल्याची खंत व्यक्त होत आहे. पूर्वीही चांदवडला अनेक वडांची झाडे होती, “मेरा जुता है जापानी ये पतलूम हिंदुस्थानी,सर पे लाल टोपी फिर भी मेरा दिल है हिंदुस्थानी” या राजकुमार यांच्या गाण्याचे चित्रीकरणही चांदवडला झाले होते.
वडाच्या फांद्यामधून भुईवर सांडलेली चंद्राची शीतल किरणे मनाला आल्हाद देत. चंद्र आणि वड यांचं अनोखं सख्य असलेलं हे चांदवड गाव अनेक ऐतिहासिक घडामोडीचे साक्षीदार आहे.चंद्रपूर,तामलिंदापुर अशी ओळख पुसत याच वडाच्या झाडांनी चांदवड ही नवी ओळख या गावाला दिली.
आज डोळ्यादेखत झाडांची कत्तल होताना पाहून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. कितीतरी आठवणी झाडांच्या मुळाशी तग धरून आहेत. हळवी मने आठवणी जपण्याचा कितीतरी खटाटोप करीत आहेत. चांदवडच्या प्रगतीसाठी ही वृक्षतोड अटळ असून ती थांबवणेही कुणाच्या हातात नसल्याने पश्चाताप व्यक्त केल्याशिवाय कुणीही काही करू शकत नाहीये.
सोशल मीडियातून झाडांच्या कत्तलीचे फोटो आणि हळहळ व्यक्त करणारे भावनिक मेसेज सर्वत्र फिरत आहेत. गेली अनेक वर्षे मनमाड चांदवड माहामर्ग विकासापासून वंचित राहिला आहे. अनेक अपघात ,हालअपेष्टा आंदोलने या रस्त्याने पाहिली आहेत. नुकतीच या विकास कामाला गती मिळाली असली तरी रस्त्याच्या कडेला वर्षोनुवर्षे उभी असलेली डेरेदार वडाची झाडे आपली आहुती देऊन नव्या विकासाची वाट बघत असली तरी भविष्यात अशी झाडे पुन्हा लावून ती जगवण्याची हमी मात्र कुणी घेताना दिसत नाहीये.
रस्त्या सोबत नव्या झाडांची लागवड केली जाईल काय? ती जगवण्याची जबाबदारी कोण घेईल? हे नवे प्रश्न पर्यावरण प्रेमींच्या मनात आहेत.तोडलेल्या झाडांच्या पाच पट झाडे लावण्यात येऊन त्याचे संगोपन प्रशासनाने करावे अशी मागणी जनतेकडून होत आहे.