मुंबई – तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल, तर आम्ही सांगतो ते आसन नक्की करा, तुम्हाला त्याचा निश्चितच फायदा होईल. तर हे आसन आहे हनुमानासन. हे आसन केल्याने वाढत्या वजनाला आळा बसतो. हाडे लवचिक होतात, तसेच मांसपेशी मजबूत होतात आणि ताण तणावापासून सुटका होते. तुम्हालाही फिट अँड फाईन राहायचं असेल, तर हे आसन नक्की करून पहा.
आपल्या रोजच्या दिनचर्येमुळे आपल्या तब्येतीवर विपरीत परिणाम होत आहेत. वेळी-अवेळी खाणं, झोपेचे अनियमित तास, अरबट चरबट खाण्यावर भर यांमुळे निरनिराळे आजार मागे लागण्यासोबतच वजनही वाढते आहे. यासाठी नियमितरित्या काही ना काही व्यायाम, योगासने करणे केव्हाही चांगले.
हनुमानासन कसे करावे?
उजवा पाय पुढे घेऊन, दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन सूर्याच्या दिशेने तोंड करून उभे राहावे. मग हळूहळू गुडघ्यांवर बसत पाय ताणण्याचा प्रयत्न करावा. पाय पूर्ण ताणले गेल्यावर उजव्या पायाची बोटे आकाशाच्या दिशेने असतील तर डाव्या पायाची बोटे ही जमिनीला टेकलेली असतील. मग हात जोडून ते डोक्यावर सरळ रेषेत धरावेत. शक्य असल्यास थोडे ताणून घ्यावेत. दररोज हे आसन केल्याने निश्चितच फायदा होतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
टीप – सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला कोणताही शारीरिक त्रास असेल तर वैद्यकीय सल्ल्याशिवाय हे आसन करू नये. तसेच पाय ताणले जात नसतील तर प्रशिक्षित योग शिक्षकाकडून याचे धडे घ्यावेत.