नाशिक – लोकसेवा हक्क अधिनियम , २०१५ च्या उद्दीष्टानुसार नागरीकांना पारदर्शक , कार्यक्षम व समयोचित सेवा देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी राबविलेला उपक्रम नाविन्यपूर्ण आणि कौतुकास्पद आहे, वस्तुत: कोव्हीड संसर्गाच्या आव्हानात्मक काळात नाशिक जिल्ह्यात १० लाखापेक्षा अधिक सेवा दिल्या गेल्या हे लोकाभिमूख कामकाजाचे उदाहरण आहे, असे कौतुकोद्गार राज्याचे मुख्य लोकसेवा हक्क आयुक्त स्वाधीन क्षत्रीय यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाबाबत अभिनंदन करताना म्हटले आहे .
या संदर्भात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना लिहिलेल्या अभिनंदनपर पत्रात श्री. क्षत्रीय यांनी म्हटले आहे की, लोकसेवा हक्क अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नाशिक जिल्ह्यात महसूल विभागाशी निगडीत ८१ सेवा नव्याने अधिसूचित करुन तहसिल कार्यालय, उप विभागीय कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखांमार्फत दि . २६ जानेवारी २०२० पासून पुरविण्यात येत आहेत. या सर्व सेवा ऑनलाईन देण्याकरीता कार्यवाही सुरु आहे. जानेवारी २०२० ते सप्टेंबर २०२० या कालावधीत नाशिक जिल्ह्यात एकूण १० लाख ३९ हजार ४०४ सेवा पुरविण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाबाबत त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. लोकसेवा हक्क कायद्याबाबत यापुढेही असेच उल्लेखनिय कामकाज जिल्हाधिकारी श्री . मांढरे यांनी करण्यासाठी प्रोत्साहनही या अभिनंदनपर पत्रात राज्याचे लोकसेवा हक्क मुख्य आयुक्त श्री क्षत्रीय यांनी दिले आहे.
करोना काळात इतर अनेक व्यवधानांमध्येच व्यस्त असताना देखील सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी सेवा हमी कायद्याचा उद्देश लक्षात घेऊन विशेष प्रयत्न करून इतक्या सेवा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना दिले आहेत ही बाब जिल्हा प्रशासनास खूप भूषणावह आहे असे मत व्यक्त करून याबद्दल श्री मांढरे यांनी सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.