नवी दिल्ली :अर्थसंकल्पीय अधिवेशनात कॉंग्रेसने पंजाबचे खासदार रवनीतसिंग बिट्टू यांना लोकसभेत काँग्रेसच्या पक्षनेतेपदी नियुक्त केले आहे. पश्चिम बंगालचे ज्येष्ठ नेते खासदार अधीर रंजन चौधरी त्यांच्याकडून ते पदभार स्विकारतील.
अधीर रंजन चौधरी पुढील दोन महिने प्रचारात व्यस्त असतील, अशा परिस्थितीत त्यांच्या जागी रवनीत बिट्टू यांना ही जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अधीर रंजन चौधरी हे पश्चिम बंगाल मध्ये कॉंग्रेसचे प्रांताध्यक्षही आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात पक्षाच्या वतीने मुद्दे मांडण्याची जबाबदारी सध्या बिट्टू यांची असेल. लोकसभेत पक्षाचे उपनेते गौरव गोगोई हेही सध्या आसाममधील निवडणूक कामात व्यस्त आहेत. तिसऱ्यांदा लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आलेले बिट्टू पहिल्यांदा आनंदपूर साहिब जागेवर विजयी झाले होते. पंजाबचे माजी मुख्यमंत्री बिअंत सिंग यांचे ते नातू आहेत. बिट्टू हे राहुल गांधींचे निकटचे नेते मानले जातात. पंजाबमधील संघटनात्मक निवडणुकीनंतर ते युवा कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी जंतर-मंतर येथे आंदोलन केले.