नाशिक – राज्याच्या समाज कल्याण विभागात आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतून लोकशाही दिनाच्या धर्तीवर “ कर्मचारी दिन ” आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय विभागाच्या वत्तीने घेण्यात आला आहे. शासनात प्रथमच अश्याप्रकारचा उपक्रम समाज कल्याण विभागाच्या वत्तीने राबविण्यात येत आहे.
विभागातील अधिकारी व कर्मचारी हे विविध प्रकारच्या योजना अंमलबजावणीचे काम करत असतात त्यासाठी त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण दिले जाते. सर्व अधिकारी व कर्मचारी त्यांच्या परीने योजना राबविण्याचा प्रयत्न करीत असतात. मात्र कामाच्या व्यापात अधिकारी व कर्मचारी यांचे सेवाविषयक प्रश्नांअकडे दुर्लक्ष होते त्यातून प्रश्न सुटत नसल्याने अधिकारी व कर्मचारी हे चिंतेत व तणावाखाली काम करीत असतात याचा परिणाम प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर व गतिमानतेवर होत असतो. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी यांचे सेवा विषयक प्रश्न वेळेवर विशिष्ट कालमर्यादेत सुटणे आवश्योक आहे. त्यासाठी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधण्यासाठी व त्यांचे सेवा विषयक समस्या सोडविण्यासाठी कर्मचारी दिन आयोजित करण्याबाबत आयुक्तालयाने निर्णय घेतला आहे.
याबाबत राज्यातील सर्व कार्यालयांना परिपत्रकानुसार सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा व प्रादेशिक स्तरावर दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी, तसेच प्रादेशिक स्तरावरील सर्व कार्यालयांसाठी एकत्रित दोन महिन्यातून एकदा दुसऱ्या गुरुवारी तर राज्यस्तरीय आयुक्तालय स्तरावर तीन महिन्यातून एकदा तिसऱ्या गुरुवारी याप्रमाणे कर्मचारी दिन आयोजित करण्यात येणार आहेत.
राज्यातील सहायक आयुक्त कार्यालय, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती व जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद कार्यालयातील कर्मचारी यांना त्यांचे प्रश्न जिल्हा/विभागीय स्तरावरील कर्मचारी दिनात उपस्थित करता येणार आहेत. कर्मचारी दिनामध्ये सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या तक्रारी चा सुद्धा विचार करण्यात येणार आहे.
सदर कर्मचारी दिनामध्ये सेवाविषयक बाबींचा विचार प्रामुख्याने करण्यात येणार आहे यामध्ये अग्रिमे, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके, गोपनीय अहवाल, पदोन्नती, मानीव दिनांक, शिस्तभंग विषयक प्रकरणे ,सेवानिवृत्ती प्रकरणे ,रजा विषयक प्रकरणे, इत्यादी विषय हाताळले जातील. पहिल्या कर्मचारी दिनी उपस्थित झालेल्या तक्रारीचे उत्तर दुसऱ्या कर्मचारी दिनी पूर्वी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यास देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
कर्मचाऱ्यांचा प्रश्न आयुक्तालयस्तर किंवा शासनस्तरावर असला तरी त्या संबंधाची निवेदने स्विकारुन शासानास सादर करण्याचेही परिपत्रकाद्वारे सूचित करण्यात आले आहे. कर्मचारी दिनी प्रत्यक्ष उपस्थित न राहता व्हिडिओ कॉन्फरन्स ने देखील सहभागी होता येणार आहे. सदर कर्मचारी दिनाबाबत विभागाच्या सर्व अधिकारी कर्मचारी वर्गाने स्वागत केले आहे. कर्मचारी दिनानिम्मित कर्माचा-यांचे प्रश्न सुट्ण्यास मदत होणार असल्याने त्याच्या परिणाम कामकाजावर होणार आहे. शासनात प्रथमच अश्याप्रकारचा उपक्रम समाज कल्याण विभागात होत आहे.