मुंबई – महाराष्ट्राच्या इतिहासात लोकशाही आणि घटनेने असलेली जबाबदारी न पाळणारा राज्यपाल महाराष्ट्राने कधी पाहिला नाही. हा चमत्कार सध्याच्या राज्यपालांनी केला आहे ही दुर्दैवी गोष्ट आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. बारामती येथे आज पत्रकारांनी शरद पवार यांना राज्यपाल नियुक्त सदस्यांबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
राज्यपालांकडे जी जबाबदारी असते आणि घटनेने राज्यसरकारला व मंत्रिमंडळाला जे अधिकार आहेत त्या अधिकारानुसार शिफारशी झालेल्या गोष्टींची अंमलबजावणी करणे ही जबाबदारी राज्यपालांची असते असेही शरद पवार म्हणाले.आमची अपेक्षा अशी होती की मोदीसाहेब स्वतः ते जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी राज्यपालांकडून त्यांना अशाप्रकारची अडवणूक होत असल्याची त्यांची तक्रार होती. तसे त्यांनी अनेकदा बोलून दाखवले होते हे माझ्या पाहणीत आहे. दुर्दैवाने त्यांना हे सहन करावं लागलं हे त्यांच्या राज्यातसुध्दा. महाराष्ट्रासारख्या राज्यात राज्यपाल करतायत आणि असे असताना केंद्रसरकार बघ्याची भूमिका घेतेय ही गोष्ट चिंताजनक आहे असेही शरद पवार म्हणाले.