बार्टीचे स्मार्टवर्क आता प्रबोधनातूनही
नाशिक – राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे अंतर्गत समतादूतांमार्फत संपूर्ण जिल्ह्यात तालुका स्तरावर लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांची शंभरावी जयंती महोत्सव ऑनलाइन कार्यक्रमाच्या माध्यमातून दिनांक १ ते ३ ऑगस्ट या दरम्यान साजरा करण्यात येत आहे, असे प्रकल्प अधिकारी प्रतिज्ञा दाभाडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या कथा, कादंबरी, लेखणीच्या माध्यमातून त्या काळाच्या व्यथा मांडल्या आहेत, त्यांनी आपल्या ज्वलंत लेखणीतून महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. अशा महापुरुषाची शंभरावी जयंती ऑनलाइन माध्यमातून साजरी होत आहे. कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे आज जनमानसांमधील संवाद थांबला आहे हा संवाद या ऑनलाइन कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा घडवून आणण्याचा प्रयत्न समतादूत करत आहे, असे बार्टीमार्फत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
आजच्या प्रथम सत्रात डॉ. किशोर वाघ (औरंगाबाद) , प्रा. सुधाकर नेतकर (जळगाव), दीपक गायकवाड (सिन्नर), सुनील वाघ (मालेगाव), सागर आहिरे (निफाड), दि. फ. लोंढे (परभणी), संतोष वाळवंटे (दिंडोरी), संजय जामीठकर (त्र्यंबकेश्वर), सचिन उबाळे (नाशिक) , सचिन शेवाळे (त्र्यंबकेश्वर), सुभाष पवार (चांदवड) या वक्त्यांनी आपल्या व्याख्यानातून सांगलीच्या वाटेगावपासून ते रशियापर्यंतचे अण्णा भाऊ जनतेसमोर मांडलेत. अण्णा भाऊ यांचा जीवनप्रवास, त्यांचे कार्य, त्यांचे महाराष्ट्राला जोडून ठेवण्याचे विचार मांडलेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशांत कलोखे, प्रदीप बोराडे, प्रा. दीपकराज कापडे, रामदास शिंदे, साहेबराव वळवांटे, संगीता बाविस्कर, बाळासाहेब आव्हाड, अमोल कांबळे, सविता गायखे, सचिन कांबळे, डॉ. साजेश साळुंखे हे उपस्थित होते. हा उपक्रम धनंजय मुंडे, मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहा.विभाग, विश्वजित कदम, राज्यमंत्री ( सा.न्या.व. वि. स. वि), पराग जैन – नैनुटीया (भापसे), प्रधान सचिव (सा.न्या.व.वि.स.वि.) , कैलास कणसे महासंचालक, बार्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रज्ञा वाघमारे, मुख्य प्रकल्प संचालिका (समतादूत प्रकल्प), बार्टी यांच्या संकल्पनेतून राबविला जात असून, जिल्ह्यात प्रकल्प अधिकारी प्रतिज्ञा दाभाडे व समतादूत या कार्यक्रमांसाठी परिश्रम घेत आहे असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे .