गोंदेदुमाला – रुचेल, पटेल, टिकेल या त्रिसूत्रीच्या वापरातून लोकांमध्ये प्रभावी जनजागृती होण्यासाठी घोटी येथील लोकशाहीर बाळासाहेब भगत यांच्या कलावंत पथकाने कंबर कसली आहे. नाशिक जिल्ह्याच्या विविध तालुक्यातील गावागावांत कलावंतांनी परिणामकारक कार्यक्रमांचे सादरीकरण करून लोकांची मने जिंकून घेतली. लोकशाहीर बाळासाहेब भगत यांचे नटराज लोककला पथकातील कलावंतांचे जनजागरण करणारे कार्यक्रम लोकांमध्ये जागृती वाढवत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मुंबई अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालय नाशिक यांच्या वतीने लोकशाहीर बाळासाहेब भगत आणि त्यांचे सहकारी कलावंत जिल्ह्यातील लोकांमध्ये जनजागरण करीत आहेत.
लोकशाहीर बाळासाहेब भगत यांच्या नटराज लोककला पथकातील कलावंतांनी नाशिक जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठा, त्र्यंबकेश्वर, ओझरखेड, येवला, ममदापुर, दिंडोरी, वरखेडा, नांदुरशिंगोटे, सिन्नर, कंक्राळे, मालेगाव, निंबोळा, देवळा, तहसील कार्यालय इगतपुरी, रेल्वे / बस स्थानक इगतपुरी आदी भागात प्रबोधन करणारे कार्यक्रम पार पाडले. कोरोनाबाबत घेण्याची दक्षता, कोरोनावरील लसीकरण कार्यक्रमाची माहिती, गंगा गोदावरी प्रदुषण आणि विविध शासकीय योजनाची माहिती कार्यक्रमातून सादर केली जात आहे. या तालुक्यातील विविध गावांत प्रभावीपणे कार्यक्रम सुरू असून लोकांचा त्यांना चांगला प्रतिसाद लाभत आहे. लोकशाहीर बाळासाहेब भगत या कलापथक संचात कलावंत धनराज म्हसणे, रोशन भिशे, विलास डावखर, देवीदास कडू, मच्छिंद्र गणाचार्य, कैलास भिशे, प्रतिक गणाचार्य, परेश जुमनाके, सिना गाडेकर आदींकडून लोकांचे मन परिवर्तन करणारे कार्यक्रम राबवले जात आहेत. संबंधित भागातील जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी बाळासाहेब भगत यांच्या कार्यक्रमांचे कौतुक केले आहे. जिल्हा माहिती अधिकारी रणजित राजपूत यांचे मार्गदर्शन मिळाल्याने प्रभावी कार्यक्रम होत असल्याचे कलावंतांनी सांगितले.
प्रतिसाद मनोबल वाढवणारा
रक्तात ओतप्रोत भरलेली संपूर्ण लोककला जनतेच्या कल्याणासाठी आम्ही अर्पण करत आहोत. शासकीय योजना, कोरोनासह विविध आजारांचे जनजागरण आणि सदृढ पिढी निर्माण होण्यासाठी आम्ही प्रबोधन करत आहोत. विविध भागात आम्हाला मिळालेला प्रतिसाद आमचे मनोबल वाढवणारा आहे.
– लोकशाहीर बाळासाहेब भगत, नटराज कलावंत पथक