लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृती शताब्दी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी समारोह मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
मुंबई – लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृती शताब्दी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी हे एकत्र असणे एक योगायोग आहे. या दोन्ही महापुरुषांबद्दल आपण काय बोलावे, यापेक्षा आपण त्यांच्याकडून काय घ्यावे, हे अधिक महत्त्वाचे आहे. हे दोन्ही महापुरुष शब्दप्रभू होते, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन, मुंबई विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृती शताब्दी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी समारोह कार्यक्रम ऑनलाइन आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, या दोन्ही महापुरुषांकडे मत-हिंमत आणि किंमत होती. स्वतःचे मत होते आणि ते मत मांडण्याची हिंमत त्यांच्यात होती आणि त्याही पलीकडे जाऊन होणारे परिणाम आणि त्यासाठी मोजावी लागणारी किंमत हे सगळे पचविण्याची ताकद त्यांच्यात होती. कोणत्याही परिणामांची पर्वा न करता त्यांनी आपले परखड मत मांडले. निवडणूक-सत्ता-अधिकार नसताना देशाचे नेतृत्व करणे सोपे नव्हते, त्याकाळी जनजागृतीसाठी मीडियासारखे माध्यम नसताना जनतेला जागे करण्याचे कार्य त्यांनी केले. घराघरांत साजरा होणारा गणेशोत्सव हा सार्वजनिक केला. टिळकांच्या आयुष्यात अचूकतेला खूप महत्त्व होते. गणित आणि संस्कृत या विषयामध्ये त्यांचे प्रभुत्व होते. टिळकांच्या प्रेरणेच्या उर्मीने देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यांना अपेक्षित असणारे स्वराज्य आपण निर्माण करणे अपेक्षित आहे.