नवी दिल्ली – कोरोनाविरोधात वर्षभरापासून आपला लढा सुरू आहे. अशात व्यवस्थेत आलेली मरगळ आणि थोडी शिथिलता स्वाभाविक आहे. परंतु आपल्याला दोन-तीन आठवडे आणखी कठोरता अवलंबून प्रशासनाला भक्कम करावे लागेल.
देशातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्सफरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनेतेला संबोधित करताना हे वक्तव्य केले आहे. देशात लॉकडाउन लावण्याच्या शक्यतेलाही पंतप्रधान मोदी यांनी फेटाळून लावले. सध्या आपल्याकडे साधनांची उपलब्धता असल्यामुळे लॉकडाउन लावण्याची गरज नाही. प्रतिबंधित क्षेत्रांवर सूक्ष्मरित्या लक्ष केंद्रित करावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, सध्या टेस्ट, ट्रीट आणि ट्रॅकिंगवर भर द्यावा लागणार आहे. लोकांचे सहकार्य आणि आरोग्य कर्मचार्यांद्वारे स्थितीवर नियंत्रण मिळवण्याची मदत झाली असून अजूनही परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. राज्यांतील प्रशासनामध्ये शिथिलता आली असून वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंताही वाढली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर एकजूट साधावी लागेल. लोक अधिक निष्काळी झाले आहेत. काही राज्यांमध्ये संसर्ग अधिक आव्हानात्मक झालेला आहे. वाढता पॉझिटिव्हीटी दर चिंतीत करणारा आहे. आपल्याला हा दर पाच टक्क्यांहून खाली आणण्यासाठी काम करावे लागेल. त्यामुळे टेस्टिंग आणि ट्रेसिंग वाढवण्यावर भर द्यावा.
आपण सर्वांनी मिळून लस नसतानाही कोरोनाचा लढा जिंकला होता. लस येईल की नाही, याची शाश्वतीसुद्धा नव्हती. आज आपल्याला घाबरायचे कारण नाही. पूर्वीप्रमाणेच पुन्हा आपल्याला जोरदार लढा देऊन तो जिंकायचा आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांचे पाच मंत्र
१) ११ ते १४ एप्रिलपर्यंत लसीकरण उत्सव साजरा करावा. यादरम्यान जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. २) वर्षभरातील लढ्यात आलेली मरगळ स्वाभाविक आहे. परंतु आपल्याला आणखी काही दिवस हा लढा असाच सुरू ठेवायचा आहे. ३) काही राज्यांमध्ये प्रशासनाच्या स्तरावर शिथिलता आलेली आहे. वाढत्या संसर्गामुळे चिंता वाढलेली आहे. ४) राज्यांमधील प्रत्येक संसर्गग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या ३० लोकांची ७२ तासात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्याची गरज आहे. ५) जे राजकारण करू इच्छितात, ते करू शकतात, मी यावर काहीच बोलणार नाही. आपल्याला महामारीविरोधात एकजुटीने काम करावे लागेल.