नाशिक : लॉकडाऊन काळात कोवीड – १९ नियमांचे उल्लंघन करणे अनेकांना महागात पडले आहे. शनिवार पाठोपाठ सोमवारी जिल्हा न्यायालयातील वेगवेगळ्या कोर्टात सुरू असलेल्या ८९ खटल्यांमध्ये संबधीताना शिक्षा सुनावण्यात आली असून, त्यांच्याकडून सुमारे ५२ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कडक नियमांची अंमलबजावणी करण्यात आली. या काळात न जुमानणा-या नागरीकांवर थेट गुन्हे दाखल करून खटले दाखल करण्यात आले. या खटल्यांच्या सुनावण्यापूर्ण झाल्या असून सोमवारी ८९ जणांना दोषी ठरविण्यात येवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. शनिवारी (दि.१७) न्यायालयाने ७३ बेशिस्तांना दणका दिला होता. त्यापाठोपाठ सोमवारी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी पी.ए.राजपूत यांच्या कोर्टात २५ ,तर न्या.टी एन.कादरी यांच्या कोर्टात ३१ जणांना शिक्षा सुनावण्यात आली. संबधीतांना प्रत्येकी ६५० रूपयांचा दंड ठोठावण्यात आला. ही कारवाई सुरक्षीत अंतर,सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळणे, मास्कचा वापर तसेच थुंकण्यास मनाई हुकूमाचे उल्लंघन आदी नियमांच्या आधारे करण्यात आली. तर मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भादवी कलम १८८ अन्वये न्या. एच.यू जोशी यांच्या कोर्टात ८ जणांना प्रत्येकी चारशे रूपयांचा दंड ठोठावण्यात आला. तर न्या.एस.के.दुगावकर यांच्या कोर्टात १६ इसमांना दोषी ठरविण्यात आले. संबधीताना प्रत्येकी ६०० रूपये तर न्या. बी.के.गावंडे यांच्या कोर्टात पाच जणांना दोषी ठरविण्यात येवून त्यांच्याकडून प्रत्येकी ४०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. न्या.एस.के.ढेकळे यांच्या कोर्टात चार जणांवर खटला चालला सर्वांना प्रत्येकी दोनशे रूपये दंड ठोठावण्यात आला. अशा प्रकारे सोमवारी (दि.१९) ८९ जणांना दोषी ठरविण्यात आले असून त्यांना सुमारे ५२ हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे.
…..