विजेची मागणी वाढताच महानिर्मितीच्या परळी वीज केंद्रातील २५० मेगावॉट क्षमतेचा संच क्रमांक ८ आणि भुसावळ वीज केंद्रातील प्रत्येकी ५०० मेगावॉट क्षमतेचे संच क्रमांक ४ व ५ मधून वीज उत्पादन सुरु झाले आहे. राज्यातील वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी वीज कंपन्यांनी वीज उत्पादन संच सज्ज ठेवावे तसेच तांत्रिक यंत्रणा सक्षम ठेवून कुशल मनुष्यबळाचा सुयोग्य वापर करावा, असे निर्देश तिन्ही वीज कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना डॉ. राऊत यांनी दिले आहेत. राज्यातील पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या भागातील वीजयंत्रणा पूर्ववत करण्याचे खडतर आव्हान महावितरण समोर असून युद्धस्तरावर कामे हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र शासनाने अनलॉक-४ बाबत नवीन नियमावली जारी केल्यानंतर राज्य शासनाने ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला असल्याने आता बऱ्यापैकी शासकीय, निमशासकीय कार्यालये सुरु झाली आहेत. हॉटेल्स, रेस्टॉरंटला परवानगी देण्यात आली आहे दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने यांच्या वेळा वाढवून दिल्या आहेत, उद्योगांची चाके देखील वेग घेत आहेत. एकूणच ‘कोविड-१९’ आणि लॉकडाऊनमुळे संपूर्ण समाजजीवनाची मंदावलेली गती आता हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली असल्याने विजेच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.