नवी दिल्ली – २२ मार्च २०२० हा दिवस कोणीच विसरू शकत नाही. कोरोना विषाणूच्या मोठ्या प्रादुर्भावामुळे देशभरात याच दिवशी लॉकडाउन लावण्यात आला होता. परिणामी संपूर्ण देश स्तब्ध झाला होता.
रस्त्यांवर शुकशुकाट पसरला होता. लोक घरांमध्ये बंद झाले होते. आयुष्य थांबल्यासारखीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्या दिवशी मेणबत्ती लावून आणि थाळी वाजवून लोकांनी एकमेकांचा उत्साह वाढवला होता. आज त्याच जनता कर्फ्यूला एक वर्ष पूर्ण झालं आहे. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आज भारत पाय रोवून उभा आहे. परंतु लसीकरण सुरू झाल्यानंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं पुन्हा चिंता वाढली आहे.
कोरोनाचा प्रसार वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९ मार्च २०२० रोजी देशाला संबोधित केलं होतं. त्यादरम्यान त्यांनी प्रथमच जनता कर्फ्यू शब्दाचा वापर केला होता. पंतप्रधानांनी देशातील नागरिकांना एक दिवस कर्फ्यू लावण्याचं आवाहन केलं होतं. पंतप्रधानांच्या आवाहानाला प्रतिसाद देत नागरिकांनी जनता कर्फ्यूला पाठिंबा दिला होता.
अशाप्रकारे २२ मार्च २०२० ला कोरोनामुळे जनता कर्फ्यू लावण्यात आला होता. कोरोनापासून बचावासाठी संपूर्ण देशात लॉकडाउन लावण्यात आला होता. लॉकडाउन लावल्यानंतर रेल्वे, बस, मॉल, बाजार, शाळा, महाविद्यालये, रुग्णालयातील ओपीडी बंद करण्यात आलं होतं. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू होत्या. त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट पसरला होता. रेल्वे रूळावर फक्त मालगाड्याच धावत होत्या. प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता.
२२ मार्च २०२० या दिवशी पंतप्रधान मोदी यांच्या आवाहानानंतर नागरिकांनी थाळी वाजवून आणि सायंकाळी मेणबत्ती लावून एकमेकांचा उत्साह वाढवला. सद्यस्थितीत जनजीवन पूर्ववत होत असले तरी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास पुन्हा सुरुवात झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांना कोरोना नियमांचं तंतोतंत पालन करणं गरजेचं आहे. तरंच आपण कोरोनावर पुन्हा नियंत्रण मिळवू शकू.