हर्षल भट, नाशिक
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचे पडसाद सर्वच क्षेत्रात दिसून येत आहेत. नोकरीच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या मनात मोठ्या प्रमाणात संभ्रम असल्याने लॉकडाउनच्या काळात बहुतांश तरुण स्टार्टअपकडे वळले आहेत. नोकरीच्या संधी कमी होत असल्याचे मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग आत्मनिर्भर होण्याकडे पावले उचलत आहे.
मार्चपासून लॉकडाऊनचा परिणाम नोकरीवर होत असल्याने तरुणांनी स्वतः उद्योजक होण्याच्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलायला सुरुवात केली आहे. सक्तीच्या मिळालेल्या सुट्टीचा सदुपयोग स्टार्टअप सुरू करण्यासाठी अनेकांनी केला आहे. लहानशा कल्पनेतून स्वतःचा व्यवसाय साकारण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे. नोकरीमधील वाढती स्पर्धा तसेच सध्याच्या परिस्थितीमुळे पडणारे पडसाद लक्षात घेत तरुणांनी स्टार्टअपचा पर्याय निवडत उद्योजक होण्याकडे वाटचाल सुरू केली आहे. नवनवीन कला आत्मसात करून अनेकांनी घरच्या घरी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे.
घराबाहेर पडून काम करणे शक्य नसल्याने बहुतांश तरुणांनी घरातूनच लहानशा व्यवसायाला सुरुवात केली आहे. स्पर्धेच्या युगात शिक्षणासोबत स्टार्टअपचे स्वप्न पाहत असलेल्या तरुणांनी लॉकडाऊनकडे संधी म्हणून पहात असल्याचे मत व्यक्त केले आहे. दिवसेंदिवस कमी होत असलेल्या नोकरीच्या संधी लक्षात घेत सक्तीच्या सुट्टीत देखील तरुणांनी व्यवसाय करण्याचे ठरवल्याने सकारात्मक चित्र दिसून आले आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने सध्या सॅनिटायझर आणि मास्क व्यवसायाकडे बहुतांश तरुणांचा कल दिसून येत असून बेकरी उत्पादन, शोभेच्या वस्तू अशा निरनिराळ्या स्टार्टअपकडे तरुण संधी म्हणून पाहत आहेत. डिजिटल मार्केटिंग, आयटी क्षेत्रात उपयुक्त ठरणारे सॉफ्टवेअर तयार करण्याकडे अनेकांचा कल दिसून आला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नोकरीच्या संधी कमी होत असल्याचे दिसताच आत्मनिर्भर होण्याकडे अनेकांची पावले वळू लागली आहेत.
लॉकडाऊनकडे सकारात्मक दृष्टीने संधी म्हणून पाहणे आवश्यक आहे. मार्चपासून स्वतःचा बेकरी व्यवसाय घरच्या घरी सुरू केला. केक, बिस्कीट असे निरनिराळे पदार्थ घरी तयार करून ग्राहकांना देत आहे. स्वतःमधील कौशल्य विकसित करत आत्मनिर्भर होण्याकडे पाऊल टाकले असून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याने समाधानी आहे.
– संपदा कानवडे
– संकेत शहाणे