रक्षाबंधनानिमित्तही खरेदीचा उत्साह
भावेश ब्राह्मणकर
नाशिक – कोरोना विषाणूचा संसर्ग आणि लॉकडाऊन या साऱ्यात एक सुखद बातमी समोर आली आहे. एप्रिल ते जुलै या लॉकडाऊन काळात नाशिक जिल्ह्यामध्ये ७ हजार ९४७ वाहनांची नोंदणी झाली आहे. यामुळे वाहन व्यवसायाला बळ मिळाले असून दिवसेंदिवस खरेदीचा उत्साह वाढत आहे. रक्षा बंधनाच्या दिवशीही शहर व जिल्ह्यात वाहन खरेदीचा जोर असल्याचे दिसून येत आहे.
कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. मात्र, आता सारे हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्यातच वाहन व्यवसाय क्षेत्रातून एक चांगली बाब समोर येत आहे. एप्रिल ते जुलै या तीन महिन्यात नाशिक जिल्ह्यात जवळपास आठ हजार वाहनांची विक्री झाली आहे. म्हणजेच ग्राहकांची वाहन खरेदीला पसंती असल्याचे दिसून येत आहे.
राज्याच्या परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन काळात मुंबई मध्ये ११ हजार ८३१, नागपूरमध्ये ८ हजार ३३५, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सर्वाधिक २३ हजार ३०० तर नाशिकमध्ये ७ हजार ९४७ वाहनांच्या खरेदीची नोंद झाली आहे. राज्यामध्ये महानगरात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. सुरक्षितता राखण्यासाठीही वाहनांची खरेदी वाढत आहे. सद्यस्थितीत दुचाकी वाहनांवर दोन व्यक्तींना वाहतूक करण्यास परवानगी नाही. कोरोनाचा संसर्ग रोखणे आणि सध्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने खासगी वाहनांच्या वापराला अधिकाधिक पसंती मिळत आहे. त्यामुळेच वाहनांच्या शो रुममध्ये दुचाकी ते चारचाकी वाहनांच्या खरेदीची चौकशी मोठ्या प्रमाणात होत आहे. सोमवारी रक्षा बंधनाच्या दिवशीही वाहनांची डिलेव्हरी घेण्याकडे ग्राहकांचा कल होता. ग्राहकांच्या या उत्साहामुळे वाहन बाजारातील मरगळ झटकण्यास मोठी मदत होत आहे.
—
कोरोनाच्या नियमांचे पालन आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची अनुपलब्धता यामुळे एका मोठ्या उद्योगाने तब्बल ५५० वाहनांचे बुकींग आमच्याकडे केले आहे. यातील १५० वाहने आम्ही दिली आहेत. यापुढील काळात अन्य वाहने दिली जातील. तर, रक्षाबंधनाच्या दिवशी बुकींगच्या अन्य ४० वाहनांची डिलेव्हरी आम्ही देत आहोत.
- विनय बिरारी, संचालक, साई मोटर्स
—
सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी वाहन खरेदीला ग्राहकांची पसंती आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांची चौकशी तसेच विक्रीला उत्तम प्रतिसाद आहे. फोर्डचे बीएस ६ डिझेल वाहन आमच्याकडे असल्याने त्यास मोठी मागणी आहे.
- ओम मोहरीर, संचालक, मोहरीर ऑटो