हजारीबाग (झारखंड) – देशभरात लॉकडाउन करण्यात आला होता, मात्र झारखंड येथील हजारीबाग येथील हैदर या गावासाठी ही वेळ सोन्याहून पिवळी ठरली. देशाच्या कानाकोपर्यतून लोक गावाकडे परत येत होते, अशावेळी अमितेश हा युवा इंजिनीअर सुद्धा गावाकडे परतला. गावातील अनेक समस्या लक्षात घेऊन त्याने प्रयत्न सुरू केले आणि चक्क १ हजार कोटी रुपयांची कामे गावात सुरू झाली आहेत.
गावात येताच क्षणी अमितेशला समजले की, शेजारी राहणार्या एका महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाला. विहीरीत सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची भिंत तयार करण्यात आली नव्हती. यासारख्या निरनिराळ्या समस्यांसाठी कंपनीकडे तो संपर्क करू लागला. सध्या १२ हून अधिक कंपन्या येथे सीएसार फंड अंतर्गत काम करत आहेत. गावात काम सुरू झाल्यावर सर्वप्रथम विहिरीत पडून मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या घराजवळ पाण्याची टाकी बांधण्यात आली.
एकेकाळी उग्रवादावरून हिणवले जात असताना आता मात्र अमितेशचे सर्वजण कौतुक करतात. या गावात रस्ते, वीज, पाणी, शाळा, हॉस्पिटल, पूल तसेच इतर दैनंदिन सुविधांचा अभाव आढळून आला. काम सुरू होण्याआधी गावाची परिस्थिति इतर गावांप्रमाणे होती. मात्र, काम सुरू झाल्यापासून गावाचे रूप पालटले आहे. गावात राहणार्या एका तरुणाच्या पुढाकाराने गावाचे चित्र बदलले आहे.
अमितेश या इंजिनीअर तरुणाने काही कंपन्यांच्या मदतीने गावात विकास गंगा आणली आहे. अमितेशने आयआयटी मुंबई येथे शिक्षण पूर्ण केले असून ओएनजीसीमध्ये इंजिनीअर म्हणून काम करत होता. मात्र लॉकडाउनमध्ये त्याला मूळ गावी परतावे लागले. गावी परतल्यावर कंपन्यांच्या मदतीने त्याने प्रत्येक घरात पाणी देण्याचे नक्की केले. तसेच ग्रीनफील्ड स्मार्ट विलेज तयार करण्याच्या दृष्टीने तो सध्या काम करत आहे. अमितेशने दिलेल्या माहितीनुसार गावाच्या विकासासाठी कंपनी १००० कोटी रुपये खर्च करणार आहे.
असे मिळाले यश
अमितेशने काम करत असलेल्या ओएनजीसी कंपनीला गावाच्या विकासासंदर्भात माहिती दिली. त्यानुसार गावातील दैनंदिन सुविधा पूर्ण करण्यासाठी त्याने कंपनीकडे प्रस्ताव टाकला. कंपनीकडून परवानगी मिळाल्यावर त्याने सीएसआर फंड अंतर्गत रक्कम गोळा केली. कंपनीतर्फे पाइपलाइनद्वारे प्रत्येक घरात पाण्याची व्यवस्था केली. तसेच टाटा पॉवर, रिलायन्स यासारख्या कंपन्यांच्या मदतीने गावातल्या विजेची समस्या दूर केली.
पंतप्रधानांनी केले कौतुक
अमितेश आणि हैदर गावाची ओळख दिल्ली पर्यंत पोहोचली आहे. पीएमओतर्फे अमितेशच्या कामाचे कौतुक होत आहे. सात नोव्हेंबर रोजी मन की बातमध्ये पंतप्रधानांनी अमितेशच्या कामाचे कौतुक केले. तसेच ट्विटरद्वारे जास्तीत जास्त जणांना ही माहिती कळावी यासाठी त्यांनी शेअर करण्याचे आवाहन केले आहे. केंद्रीय शिक्षा मंत्र्यांनी देखील त्याच्या या कामाचे कौतुक केले आहे.