नाशिक – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहिर केलेले असतांना नियमांचे उलंघन करणाऱ्या ७३ बेशिस्तांना न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. शनिवारी (दि.१७) जिल्हा न्यायालयातील वेगवेगळ्या कोर्टात सुरू असलेल्या खटल्यांमध्ये संबधितांना शिक्षा सुनावण्यात आली असून, त्यांच्याकडून सुमारे ४७ हजार ३०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनस्तरावरून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. सुरक्षित अंतर,सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळणे, मास्कचा वापर तसेच थुंकण्यास मनाई आदी नियमांचे अद्याप काटेकोर पालन केले जात आहे. मात्र काही बेशिस्तांकडून त्याचे उलंघन होत असल्याने पोलीस यंत्रणा गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यावर उतरली आहे. शहरातील तेरा पोलीस ठाण्यातंर्गत बेशिस्तांवर दरडोई कारवाई केली जात असून, संबधीतावर थेट न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले जात आहे.
अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी पी.ए.राजपूत यांच्या कोर्टात २५ जणांवर हा खटला चालला न्यायालयाने सर्व संशयीतांना दोषी ठरवत त्यांना प्रत्येकी ७०० रूपये दंड ठोठावला आहे. तर न्या.टी.एन.कादरी यांच्या कोर्टात ३४ इसमांना दोषी ठरविण्यात आले. संबधीताकडून प्रत्येकी ७०० रूपयांचा दंड आकारण्यात आला. तर मनाई आदेशाचे उलंघन केल्याप्रकरणी १४ जणांना शिक्षा सुनावण्यात आली.
अति.मुख्य न्यायदंडाधिकारी एच.यु.जोशी यांनी ८ इसमांना प्रत्येकी ४०० रूपयांचा दंड ठोठावला तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दुगावकर यांनी दोन इसमांना दोषी ठरवून त्यांच्याकडून प्रत्येकी ६०० रूपये दंड आकारण्यात आला. तर अति.मुख्य न्यायदंडाधिकारी बी.के.गावडे यांच्या कोर्टात चाललेल्या चार बेशिस्तांच्या खटल्यात प्रत्येकी ४०० रूपये दंड सुनावण्यात आला.
शनिवारी (दि.१७) हा निकाल लागला. त्यात महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ११०,११७ चे उलंघन केल्याप्रकरणी न्यायालयाने ५९ इसमांना ४१ हजार ३०० रूपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. तर भारतीय दंड विधान कायद्याचे कलम १८८ चे उलंघन केल्याप्रकरणी १४ इसमाना सहा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.