नाशिक – कोरोना लॉकडाऊनमधून सूट मिळाल्यानंतर आतापर्यंत १३ हजारापेक्षा अधिक प्रवाशांनी नाशिक विमानसेवेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे ओझर विमानतळाच्या ठिकाणी सुरू असलेली नाशिक-पुणे, नाशिक-हैदराबाद आणि नाशिक-अहमदाबाद या सेवेला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे. एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या अलायन्स एअर आणि खासगी कंपनी ट्रु जेट यांच्यावतीने ही सेवा दिली जात आहे. हैदराबाद व पुणेसाठी दररोज एक तर अहमदाबादसाठी दररोज दोन सेवा आहेत. मे महिन्यात ६१, जून महिन्यात २ हजार १५३, जुलै महिन्यात २ हजार ८८०, ऑगस्ट महिन्यात ३ हजार ९१४ आणि सप्टेंबर महिन्यात ४ हजारापेक्षा अधिक प्रवाशांनी विमानसेवेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे २७ मे पासून सप्टेंबर अखेरीपर्यंत १३ हजारापेक्षा अधिक प्रवासी नाशिक विमानतळावरुन तिन्ही शहरात किंवा तिन्ही शहरातून नाशकात आले आहेत.
दिल्ली विमानसेवेची निकड
नाशिक ते दिल्ली ही विमानसेवा बंद पडली आहे. केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत ही सेवा पुन्हा सुरू होण्याची जोरदार मागणी होत आहे. खासगी विमान कंपन्यांनी या सेवेसाठी पुढाकार घ्यावा, असे मत उद्योजक वर्तुळातून व्यक्त होत आहे.