नाशिक – शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गावर लेखानगर उड्डाणपुलाजवळ ट्रकच्या धडकेत दुचाकीवरुन जाणारे ३ साईभक्त ठार झाले आहेत तर १ जण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेवाडी (विलेपार्ले, मुंबई) येथील सिद्धार्थ भगवान भालेराव (वय २२), वैजनाथ जालिंदर चव्हाण (वय २१), आशिष महादेव पाटोळे (वय १९) व अनिश अरुण वाकळे (वय १७) दोन दुचाकींवरून (एमएच ०२ एफएच ०६१० व एमएच ०२ एफडी ४२४८) शिर्डीकडे जात होते. शनिवारी (दि. २) मध्यरात्री १२.४५ च्या सुमारास शहरातील लेखानगरजवळ उड्डाणपुलावरून जात असताना त्यांच्या जवळून एक वाहन भरधाव जात असताना त्याचा दुचाकींना धक्का लागल्याने दोन्ही दुचाकींवरील युवक खाली पडले. याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकखाली चिरडले गेल्याने चौघेही गंभीर जखमी झाले. या ठिकाणाहून जाणाऱ्या काही चालक व प्रवाशांच्या मदतीने चौघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, डॉक्टरांनी वैजनाथ, सिद्धार्थ व आशिष यांना मृत घोषित केले. तर अनिश वाकळे गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.