नाशिक – मुंबईत लुटमार करुन पसार होण्याचा प्रयत्न करणाऱ्या परप्रांतीयास नाशिकरोड रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या. घटनेनंतर संशयीताने उत्तर प्रदेशच्या दिशेने कुच केले होते. मात्र तो रेल्वे पोलीसांच्या जाळ्यात अडकला. नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात त्यास देण्यात आले असून त्याच्या अटकेने अनेक गंभीर गुन्हे उघडकीय येण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तविली आहे.
देवीप्रसाद शिवबा दूर पाल (१९ रा.जोहनपूर, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. रबाळे एमआयडीसी भागात संशयीताने लुटमार करीत पोबारा केला होता. याप्रकरणी गुरूवारी (दि.१) रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस संशयीताच्या मागावर असतांना उपनिरीक्षक शरद आव्हाड यांना मिळालेल्या माहिती वरून ही कारवाई करण्यात आली. संशयीत छापरा एक्सप्रेसने उत्तरप्रदेशच्या दिशेने पसार झाल्याची माहिती रबाळे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आव्हाड यांना मिळताच त्यांनी नाशिकरोड रेल्वे पोलीसांशी संपर्क साधल्याने संशयीत पोलीसांच्या जाळ््यात अडकला. आव्हाड यांनी पाठविलेल्या छायाचित्राच्या आधारे रेल्वे पोलीसांनी छापरा एक्सप्रेसची तपासणी करीत संशयीतास बेड्या ठोकल्या. ही कारवाई नाशिकरोड रेल्वे स्थानकात करण्यात आली. सहाय्यक निरीक्षक विष्णू भोये,हवालदार संतोष उफाडे,चंद्रभान उबाळे,शिपाई महेश सावंत व उगले आदींच्या पथकाने ही कारवाई केली. कायदेशीर बाबी पूर्ण करून संशयीतास रबाळे पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले असून त्याच्या अटकेने मुंबईतील अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सुत्रांनी वर्तविली आहे.