देवळा – ग्रामदैवत रामेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी लिलावाच्या बोलीने संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आलेल्या उमराणे ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत देवरे यांच्या नेतृत्वाखालील श्री रामेश्वर विकास पॅनलला १७ पैकी १६ जागा मिळाल्या आहेत. उमराणे बाजार समितीचे माजी सभापती विलास देवरे यांच्या नेतृत्वाखालील कर्मवीर ग्यानदेवदादा देवरे पॅनलला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.
मतदारांनी विकासकामांना प्राधान्य न देता भावनिक होत रामेश्वर महाराज मंदिराच्या मुद्द्याला मतदान करून सत्ता परिवर्तन घडवून आणले. उमराणे येथील ग्रामदैवत रामेश्वर महाराज मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या माध्यमातून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी तब्बल दोन कोटी पाच लाख रुपयांचा लिलाव करण्यात झाला होता. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाने १३ जानेवारीला निवडणूक प्रक्रिया रद्द केली होती.









