बिटको रुग्णालयाच्या पाहणीनंतर आयुक्तांचे निर्देश
नाशिक – नाशिकरोड येथील नवीन बिटको रुग्णालयातील लिफ्टची सुविधा तातडीने सुरु करावी. तसेच तळमजल्यावर वाढीव बेडची व्यवस्थेचे काम त्वरित पूर्ण करावे, असे निर्देश महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिले.
महानगरपालिकेचे नाशिकरोड येथील नवीन बिटको रुग्णालय, समाज कल्याण कोरोना कक्ष व झाकीर हुसेन रुग्णालय या तिन्ही ठिकाणी आयुक्तांनी भेट दिली. तेथील कामकाजाची माहिती घेतली व विविध कामांच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. नाशिकरोड नवीन बिटको रुग्णालय येथील दाखल रूग्णांना दिल्या जात असणाऱ्या सुविधा, व्हेंटिलेटर, गॅस पाईपलाईन, एकूण बेड व रिक्त बेड, स्कॅनिंग मशिन, एमआरआय, सिटी स्कॅन याबाबतची पाहणी केली.
रुग्णालयाचे प्रमुख डॉ. जितेंद्र धनेश्वर यांनी सविस्तर माहिती दिली. समाज कल्याण कोरोना कक्ष येथे पाहणी करून त्या ठिकाणी असणारा कर्मचारी वर्ग, त्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने केल्या जात असणाऱ्या उपाय योजना याठिकाणी मास्क, पी. पी.कीट,औषध पुरवठा, येथील रुग्णांवर केले जाणारे औषधोपचार व इतर बाबत माहिती घेण्यात आली. तसेच या ठिकाणी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही बाबतची माहिती यावेळी डॉ. गरुड यांनी दिली.
डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय येथे पुरवठा होणारा ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड, या ठिकाणी रिक्त बेड याबाबतची सविस्तर माहिती आयुक्तांनी जाणून घेतली. रुग्णांना कुठलीही अडचण निर्माण होणार नाही, याबाबत सर्वांना दक्षता घेण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण अष्टीकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी बापूसाहेब नागरगोजे, कोरोना कक्ष अधिकारी डॉ. आवेश पलोड आदी उपस्थित होते. नाशिकरोड नवीन बिटको रुग्णालय येथे आमदार सरोज आहेर व नगरसेवक प्रशांत दिवे यांच्याशी आयुक्तांनी संवाद साधला.