नांदेड – लिंगायत धर्मगुरू राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज (वय १०४) यांचे मंगळवारी (१ सप्टेंबर) निधन झाले. वैद्यकीय क्षेत्रातील पदवी मिळवूनही शिवाचार्य महाराजांनी धर्माचरण आणि ज्वलंत राष्ट्रवादाला वाहून घेतले. विद्वत्ता आणि अमोघ वाणी यामुळे समाजाने त्यांना राष्ट्रसंत म्हणून मानाचे स्थान दिले. त्यांनी धर्म आणि राष्ट्राभिमान जागृत ठेवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. धर्मप्रसाराबरोबरच त्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातही काम उभे केले. शिवाचार्य महाराजांचे कार्य त्यांच्या लिंगायत अनुयायांसह समाजासाठी मार्गदर्शक असेच आहे.
त्यांना न्यूमोनिया झाला होता. येथील हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. ते राष्ट्रसंत अहमदपूर महाराज म्हणून ख्यात होते. लाहोर विद्यापीठात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. वीरशैव लिंगायत समाजाच्या कार्यात त्यांनी स्वतःला वाहून घेतले होते. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्र, तेलंगाणा, कर्नाटक येथील त्यांच्या लाखो अनुयायांवर शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली व्यक्त केली आहे.