लासलगाव – लासलगाव येथील ओम कलेक्शन आणि रोशन क्लाॅथ स्टोअर्सने शासनाने ठरवून दिलेले नियम धाब्यावर बसवत दुकान उघडले ठेवल्यामुळे निफाडच्या प्रांत डाॅ अर्चना पठारे व तहसीलदार शरद घोरपडे यांच्या पथकाच्या निदर्शनास येताच सदरची दोन्ही दुकाने सील करण्यात आली आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रशासनाने एकीकडे कडक निर्बंध लावलेले असून जीवनावश्यक सोडून इतर सर्व आस्थापने बंद करण्याचे सूचित केले आहे. तरी ही दोन दुकान सुरु असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. येथील कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता प्रांताधिकारी अर्चना पठारे आणि तहसीलदार शरद घोरपडे यांनी अचानकपणे लासलगाव शहरात धाड टाकत ही कारवाई केली.
दररोज जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण संख्या मोठ्या संख्येने वाढत असताना शासनाला सहकार्य करण्याऐवजी बेकायदेशीररित्या आपली आस्थापने सुरू ठेवून कोरोना वाढवण्याचा प्रकार काही दुकानदारां मार्फत सुरू असल्याच्या तक्रारी आहे. दररोज प्रशासना मार्फत जनजागृती सुरू असताना याकडे दुर्लक्ष करत काही दुकाने सुरू आहे. काही आस्थापना चालकाचे कुटुंबातील सदस्य पॉझिटिव्ह असतांना देखील दुकाने सुरू असल्याची अनेक तक्रारी आहे. या कडे लक्ष देऊन यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.