लासलगाव – लासलगाव शहर विकास सेवासमिती कडून जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी तसेच निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आरोग्य अधिकारी डॉ गावले यांना कोरोनाच्या लसीकरणाच्या सुनियोजनाबाबत निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, प्राथमिक आरोग्य केंद्र कोरोनाचे लसीकरण सुरू आहे. मात्र ही प्रक्रिया अत्यंत किचकट तसेच गोंधळ निर्माण करणारी आहे. लसीकरण स्थळी प्रचंड गर्दी होत आहे. वयोवृद्ध व्यक्तींना लसीकरणासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागते आहे. त्यांना बसण्यासाठी खुर्च्या तसेच पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था नाही. त्यांना उन्हात उभे राहावे लागत आहे. तेथील गर्दीमुळे देखील अनेकांना कोरोना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व बाबी टाळण्यासाठी लसीकरण केंद्रावर काही आवश्यक बदल करणे गरजेचे आहे. आरोग्यसेतु ॲपद्वारे किंवा ऑनलाईन लसीकरण करण्यासाठी नाव नोंदणी केलेले तसेच नाव नोंदणी न करता आलेल्या सर्वांना निमगाव वाकडा येथील आरोग्य केंद्रांवर पूर्व नोंदणी केल्याशिवाय लस उपलब्ध करून देऊ नये. लसीच्या उपलब्धतेप्रमाणे त्यांना तारीख आणि वेळ देण्यात यावी. तसेच त्यांचा संपर्क क्रमांक घेण्यात यावा. ऐनवेळी काही बदल झाल्यास त्यांना कळवण्यात यावे. आरोग्य केंद्राबाहेर उपलब्ध लसींची संख्या बोर्डवर लावण्यात यावी. लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना बसण्यासाठी सावली तसेच खुर्च्यांची, पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. शिवाय यात सोशल डिस्टंसिंग चे पालन कसे होईल याकडे लक्ष देण्यात यावे. याप्रकारे बदल न केल्यास आरोग्य केंद्राविरोधात मोठे जनआंदोलन उभे करण्यात येईल असा इशारा शहर विकास सेवा समितीच्या वतीने देण्यात आला.
सदर निवेदनाच्या प्रती सहाय्यक पोलीस निरीक्षक लासलगाव पोलीस स्टेशन, लासलगाव सरपंच, निमगाव वाकडा सरपंच यांना देण्यात आले. सदर निवेदन देतांना समितीतर्फे सचिन होळकर, धर्मेश जाधव, संदीप उगले, चंद्रकांत नेटारे, सतीश खैरनार, गणेश चांदोरे, मयूर झांबरे, अभिनव भंडारी, अमोल कर्पे, महेश मोरे, राजेंद्र कराड, प्रमोद पाटील, राजेंद्र जाधव, बाळासाहेब सोनवणे, सुरज श्रीवास्तव, हामिद शेख, दत्तात्रेय हलकन्दर, दर्शन शिंदे आदी उपस्थित होते. लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ गावले यांच्याशी संपर्क करून त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या..