लासलगाव – लासलगाव शहरात तसेच पंचक्रोशी मध्ये गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचा तसेच रहिवाशांचा थकीत वीज बिलामुळे विद्युत पुरवठा तोडण्याची कार्यवाही सुरू आहे. त्याच्याविरोधात लासलगाव शहर विकास सेवा समिती यांनी नुकतेच महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता तसेच सहाय्यक अभियंता शहर आणि सहाय्यक अभियंता ग्रामीण यांना वीज पुरवठा तोडण्याची कारवाई थांबवण्याबाबत तसेच तोडलेल्या वीजपुरवठ्याची पुर्नजोडणी करण्याबाबत निवेदन देण्यात आले. गेल्या वर्षापासून सामान्य नागरिक तसेच शेतकरी कोरोनाच्या भयानक संकटांशी सामना करत आहे. लॉकडाऊन आणि इतर सर्व बाबींमुळे अनेक आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहे. शेतमालाला बाजार भाव नाही तसेच व्यवसाय आणि रोजगार ठप्प झाल्याने जनता प्रचंड आर्थिक अडचणीतून जात आहे. या सर्व बाबींचा विचार करता महावितरणने ही धडक कारवाई त्वरित थांबवावी. तसेच जनतेच्या आर्थिक स्थितीचा विचार करता त्यांना बिल भरण्यासाठी अधिक कालावधी तसेच सूट आणि बिलाचे टप्पे करून द्यावे. अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली. महावितरणने कारवाई न थांबल्यास त्यांच्या विरुद्ध जनआंदोलन उभे करण्यात येईल असा देखील इशारा समितीच्यावतीने देण्यात आला. हे निवेदन देतांना समितीतर्फे सचिन होळकर, धर्मेश जाधव, संदीप उगले, चंद्रकांत नेटारे, सतीश खैरनार, गणेश चांदोरे, मयूर झांबरे, अभिनव भंडारी, अमोल करपे, महेश मोरे, राजेंद्र कराड, प्रमोद पाटील, राजेंद्र जाधव, बाळासाहेब सोनवणे, सुरज श्रीवास्तव, हमीद शेख, राजेंद्र हलकंदर, दर्शन शिंदे आदी उपस्थित होते..