कोरोनाबाधित झालेल्या निफाडच्या प्रांत डाॅ. अर्चना पठारे यांचा रिपोर्ट निगेटीव्ह येताच धडक मोहीम
लासलगाव – कोरोनाबाधित झालेल्या निफाडच्या प्रांत डाॅ. अर्चना पठारे यांचा रिपोर्ट निगेटीव्ह येताच त्यांनी कामाला सुरुवात केली. गुरुवारी कोरोनाबाबत बेफिकिरी दाखविणारे नागरीक व दुकानदार यांच्यावर कारवाई करत कोटमगार रस्त्यावरील एक कापड दुकान सील केले. तर बाजारात विनामास्क फिरणारे लोकांना दंड करीत सुमारे २९ हजार १०० रूपयांची दंडाची रक्कमही वसुल केली.
अचानक दिलेल्या या भेटीमुळे नागरिकांमध्ये जरब निर्माण झाला. पठारे यांनी तहसिलदार शरद घोरपडे, गटविकास अधिकारी .संदीप कराड, यांचेसह पोलिस उपनिरीक्षक म.ए.एन.कोठाळे, विस्तार अधिकारी.के.टी.गादड साहेब, तलाठी एन.आर.केदार, ग्रामविकास अधिकारी एस.व्ही.पाटील यांच्या पथकासह ही कारवाई केली. व्यावसायीकांनी जर कोरोना नियमाचे पालन केले नाही तर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासुन लासलगांव व परिसरामध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्याप्रमाणावर आढळुन येत असल्यामुळे प्रशासनाने ही कडक कारवाई केली.
नागरीकांची मोठी दमछाक
अचानक आलेल्या अधिकारी वर्गाच्या ताफ्यामुळे नागरीकांची मोठी दमछाक बघावयास मिळाली. कडक कायदा करुनही नागरीक त्याचे उल्लंघन करतांना आढळुन आले. आज अचानक ही भेट झाल्यानंतर नागरीकांबरोबरच दुकानदारांनी आपली दुकाने बंद केली. लासलगाव सह निफाड तालुक्यातील विविध बाजारात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून कोणत्याही प्रकारे कोरोना प्रतिबंधक उपाययोजना केल्या जात नाही. त्यामुळे प्रशासनाने ही कारवाई केली.