- पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लासलगाव येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण
नाशिक – दीर्घायु जेष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने आणि राज्य शासनाच्या सहकार्याने साकारण्यात आलेले जेष्ठ नागरिक भवन हे राज्यातील एक आदर्श उदाहरण असून जिल्हाभरात आवश्यक त्या ठिकाणी असे ज्येष्ठ नागरिक निर्माण करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
आज लासलगाव येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण पालकमंत्री श्री. भुजबळ यांच्या हस्ते पार पडले, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, माजी सरपंच कुसुमताई होळकर, प्रांतअधिकारी डॉ.अर्चना पठारे, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार शरद घोरपडे, गटविकास अधिकारी संदिप कराड, उपअभियंता ढिकले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश पाटील, लासलगाव ग्रामपंचायत प्रशासक सोनवणे यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, राज्यात गेल्या वर्षी महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाली. त्यानंतर विकास कामांना सुरुवात केली, मात्र लगेचच कोरोनाचं संकट ओढवलं गेले. अशा वेळी नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यास शासनाच्या वतीने प्राधान्य देण्यात आले. या काळात महसूल, आरोग्य, पोलीस आणि अन्न व नागरी पुरवठा विभागाने आहोरात्र काम केले. जोपर्यंत लस उपलब्ध होणार नाही तोपर्यंत सर्वांनी आप आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. यामध्ये मास्क, सॅनिटायझर आणि दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर या शासनाने केलेल्या सूचनांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे. कोरोना विषाणूची दाहकता तेवढीच आहे मात्र सर्व स्तरावर नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. राज्य शासनाने हळूहळू विकासकामांना निधी देण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे आता नक्की विकासकामे सुरू होतील. अधिकारी वर्गानेही मंजूर झालेल्या निधीची कामे तात्काळ पूर्ण करावीत.
कोरोनाचं संकटात राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाशी संबंधित अधिकारी कर्मचारी वर्ग चोवीस तास कामात होते. त्यामुळे दरमहा ३.५ लाख टन ते ९ लाख टनापर्यंत रेशनचे वाटप दर महिन्याला करण्यात यश आले. यामध्ये प्रामुख्याने गरीब जनता, मोलमजुरी करणारे नोकरदार वर्ग तसेच परप्रांतीय यांचा समावेश होता. आपल्या राज्याने माणूस हा घटक समोर ठेवून कोरोना विषाणूचा मुकाबला केला. गोरगरीब जनता अन्नापासून वंचित राहू नये, यासाठी शिवभोजन केंद्रातून आपण भूक भागविण्यासाठी प्रयत्न केले. यात १० रुपये दर असलेली शिवभोजन थाळीची किंमत ५ रुपये केली. केंद्रचालकांनी काही गरीब लोकांना मोफत जेवण दिले असल्याची माहिती यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी दिली.
- लासलगाव येथील रेल्वे उड्डाणपूलाच्या कामाचे काम पूर्णत्वाकडे असून सहा महिन्यात हा पूल व रस्ता नागरिकांना वापरण्यासाठी खुला करण्यात येईल. लासलगाव परिसरातील पाण्याच्या प्रश्नाबातत शासन स्तरावर काम सुरू असून येथील पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल. गावाच्या विकासासाठी लासलगाव बाजार समितीने हातभार लावावा, असे आवाहनही पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी केले.
महाविकास आघाडी म्हणजे सरकारची तीन चाके आणि नागरिकांचे एक चाक अशी चार चाकी असलेले वाहन आहे आणि ते आता विकासकामांच्या बाबतीत आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सुसाट सुटणार असून वर्षानुवर्षे ती धावणार आहे, असेही पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर जयदत्त होळकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते, विकासकामे करत असताना अतिक्रमणात ज्या अनुसूचित जाती जमातीच्या नागरिकांची घरे गेली होती त्यांना कायमस्वरूपी घरे देऊन त्यांचे सात बारा उतारे प्रातिनिधिक स्वरूपात देण्यात आले.
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज लासलगाव येथे वॉर्ड क्रमांक ३ मधील दुर्गा माता मंदिर (गणेश नगर) रस्ता काँक्रिटीकरण, जनसुविधा अंतर्गत ज्येष्ठ नागरिक हॉल, मुलभूत सुविधा अंतर्गत गुरुद्वारा रस्ता काँक्रिटीकरण, दुर्गा माता मंदिर पेव्हर ब्लॉक, महावीर शाळा ते सह्याद्री चौक रस्ता काँक्रिटीकरण, गोविंद संकुल ते डॉ. रायते रस्ता काँक्रिटीकरण, श्रीरामनगर रस्ता काँक्रिटीकरण, जिल्हा वार्षिक बिगर आदिवासी नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत अभ्यासिकेचे, लासलगाव ते स्टेशन रोड रस्ता काँक्रिटीकरण, गुरु सावली येथील रस्ता काँक्रिटीकरण, आशिर्वाद नगर रस्ता काँक्रिटीकरण, सन्मित्र हाउसिंग सोसायटी मधील रस्ता काँक्रिटीकरण, ग्रामपंचायत फंडातुन गुरु सावली येथे पेव्हर ब्लॉक, जिल्हा क्रीडा नियोजन योजने अंतर्गत व्यायामशाळा, लासलगाव अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण, महावीर जैन विद्यालय प्रांगणात सभागृह बांधणे, बालाजी नगर, डी. के. ठाकरे साहेब ते प्रफुल्लशेठ भंडारी रस्ता कॉक्रिटीकरण, वॉर्ड क्रमांक २ मधील सोहन नगर रस्ता कॉक्रिटीकरण, ९३ नंबर परिसरात रस्ता काँक्रिटीकरणाची ४ कामे या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण पार पडले.