लासलगांव – लासलगांव शहर विकास समितीतर्फे नुकतेच भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलला लासलगांवात फोर जी सुविधा उपलब्ध व्हावी, तसेच शहरातील सुविधा अखंडित सुरू राहण्यासाठी बीएसएनएलच्या उपविभागीय अभियंता कविता रेडकर यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात येत्या १०-१२ दिवसात योग्य ती तांत्रिक व्यवस्था तसेच तांत्रिक बदल करून सर्व सेवा सुरळीत न केल्यास लासलगाव शहरात मोठे जनआंदोलन करण्यात करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. सदर निवेदनाची प्रत बीएसएनएल नाशिकचे महाव्यवस्थापक तसेच खासदार डॉ भारती पवार, पालकमंत्री छगन भुजबळ, सहायक पोलीस निरीक्षक यांना पाठवण्यात आली आहे..
या निवेदनात म्हटले आहे की, लासलगाव हे आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असणारे शहर आहे. मोठी आर्थिक उलाढाल या शहरात होत असते. गावाची वाढती लोकसंख्या आणि गावातील वर्दळ, व्यवहार खुप मोठा असल्याने इंटरनेट सेवा ही अत्यावश्यक झाली आहे. सर्व व्यापारी वर्गाचे काम बीएसएनएलच्या माध्यमातून होत असते, याशिवाय कोरोना मुळे सर्व शाळा कॉलेज बंद असल्याने शिक्षण ऑनलाइन सुरु आहे. त्यामुळे चांगला स्पीड असणारी इंटरनेट सेवा खूप गरजेची आहे. मात्र बीएसएनएल कंपनीची लासलगाव मधे 4G सेवा अजून उपलब्ध नाही. तसेच शहरात अनेक भागात 2G ची रेंज मिळते. तर शहरात काही भागात बिलकुल नेटवर्क मिळत नसल्याची परिस्थिती आहे. एकंदर शहरात इंटरनेटचा स्पीड तसेच कॉलिंग्साठी देखील नेटवर्क कमी असल्याने सर्वच क्षेत्रात मोठी अड़चण निर्माण झाली आहे. शहरातील सेवा खंडित झाल्यावर बीएसएनएलकडून तत्पर सेवा मिळत नाही, तक्रारीची दखल घेतली जात नाही असे म्हटले आहे.
निवेदन देतांना सचिन आत्माराम होळकर, प्रकाश सर्जेराव पाटील, प्रवीण कदम, विकास कोल्हे, धर्मेश जाधव, बबन शिंदे, प्रमोद पाटील, संदीप उगले, राजेंद्र कराड, अभय जांगडा, अनिल आब्बड़, महेंद्र हांडगे, ललित पानगव्हाणे, रोहित पाटील, अमोल कुमावत, मयुर झांबरे, महेश बकरे , महेश मोरे, संतोष पवार उपस्थित होते.