लासलगांव – शासनाच्या पीएम किसान योजनेचे लाभार्थी म्हणुन आयकरपात्र निघाल्याने बारा हजार रूपये मागणीची नोटीस दिल्याचे कारणावरून निफाड तालुक्यातील कानळद येथील कोतवाल अमोल बाजीराव चिताळकर यांना नारायण श्रीपत जाधव रा. कानळद यांनी मोबाईलरून शिवीगाळ केल्याप्रकरणी लासलगाव पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शासनाने पीएम किसान योजनेचे लाभार्थी असलेले आयकर भरत असल्यास त्यांना खात्यावर अदा केलेली रक्कम परत करण्याची नोटीसा देण्याचे शासनाने आदेश दिले. त्यानंतर निफाड तहसीलदार शरद घोरपडे यांच्या आदेशाने तालुक्यातील शासनाने अदा केलेल्या रक्कमेची वसुली करण्याच्या नोटीसा गावस्तरावर देण्याचे काम सुरु झाले. त्यात ही नोटीस नारायण श्रीपत जाधव यांना सुध्दा गेली. यात आयकर पात्र असल्याचे स्पष्ट झाल्याचे आढळून आल्याने बारा हजार रूपये रक्कम मागणी करण्यात आली. पण, नोटीस दिल्याचा राग आल्याने जाधव यांनी निफाड तालुक्यातील मौजे कानळद येथील सजाचे कोतवाल अमोल चितळकर यांना मोबाईवरुन शिवीगाळ केली. त्यानंतर या प्रकाराची कोतवाल चितळकर यांनी लासलगांव पोलिस स्थानकात तक्रार केली. त्यानंतर भादवि कलम ५०६ व ५०७ नुसार पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. लासलगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार ठोंबरे पुढील तपास करीत आहेत.