लासलगांव – आयकर विभागाने येथील नऊ कांदा व्यापा-यांवर छापे टाकले आहेत. या पथकाने व्यापा-यांच्या सर्व व्यवहाराची तपासणीचे काम सुरु केले आहे. त्यामुळे कांदा व्यापा-यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.
घाऊक बाजारात कांदा दराने ४ हजार ८०० रूपयांचा दर ओलांडताच कांदा भावात सुरु असणारी तेजी लक्षात घेऊन आयकर विभागाने आपला मोर्चा कांदा व्यापाऱ्यांकडे वळविला आहे. लासलगाव बाजार समितीत कांद्याचे दर तीन हजार रुपयांचा टप्पा ओलांडताच केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी घोषित केले होती. तर गेल्या २ दिवसात दुसऱ्या टप्प्यात कांद्याचे दर ४ हजार ८०० रुपयांच्या पुढे गेल्याने भाव नियंत्रित ठेवण्यासाठी आयकर विभागाने लासलगाव येथील ९ कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांवर धाडी टाकल्याने व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण आहे..
कांद्याच्या दरात वाढ झाली किंवा टंचाई निर्माण झाले की असे छापे आयकर विभाग टाकत असतात. पण, त्यातून पुढे काय झाले याची माहिती येत नाही. आता टाकलेले हे छापे आहे की, सर्व्हे याबाबतही आयकर विभागाकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
आयकर विभागाच्या वतीने प्रत्येक व्यापारी वर्गाकडे तीन ते चार अधिकारी तपासणी करत आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत करण्यात आलेल्या कांदा खरेदीची माहिती या पथकाने संकलित केली आहे. देशभरात कांद्याचा प्रश्न नेहमीच कळीचा बनतो, त्यामुळे अशा कारवाईला व्यापा-यांना सामोरे जावे लागते.
हे नऊ कांदा व्यापारी कोण याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. गेल्या वेळेस आयकर विभागाने केलेल्या कारवाई विरोधात शेतकरी व व्यापारी एकवटले होते. यावेळेस परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे या कारवाईतून पुढे काय येते हे महत्त्वाचे आहे.
पैसे खाण्याचा सुरक्षित मार्ग