जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली माहिती
नाशिक – लासलगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सोळागाव पाणीपुरवठा योजनेचा नवा आराखडा लवकरात लवकर मंजूर करण्यासाठी पाणीपुरवठा मंत्री आणि वित्तमंत्री यांच्यासोबत चर्चा करून मंजुरीसाठी प्रयत्न करणार आहोत; तसेच सद्यस्थितीत या योजनेतून होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
भुजबळ फार्म येथे झालेल्या सोळा गाव पाणीपुरवठा योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी सोळागाव पाणी पुरवठा योजनेचे अध्यक्ष तथा मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, गटविकास अधिकारी संदीप कराड, ग्रामीण पाणी पुरवठा उपअभियंता संजय मिस्त्री, विस्तार अधिकारी एस.के.सोनवणे, ग्रामविकास अधिकारी शरद पाटील, लासलागावचे माजी उपसरपंच संतोष ब्रम्हेचा, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता एम.एस.गणेशे, शाखा अभियंता अमोल घुगे, पांडुरंग राऊत, विजय सदाफळ आदी उपस्थित होते.
यावेळी नव्या आराखड्यास मंजुरी मिळेपर्यंत योजनेच्या पाईपलाईनचे जिल्हा परिषदेमार्फत तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश दूरध्वनीद्वारे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांना पालकमंत्री भुजबळ यांनी दिले आहेत.
सोळागाव योजनेची पाईपलाईन १५ ते २० वर्ष जुनी असलेली पाईपलाईन खराब झाल्याने अनेकदा लिकेजचे प्रश्न निर्माण होत असतात. याबाबत पालकमंत्री भुजबळ यांनी विधान सभेच्या सभागृहात विषय मांडला होता. त्यानुसार सदर योजनेसाठी नवीन पाईपलाईन लाईन टाकणे व विजबिल खर्च कमी करण्यासाठी सौर प्रकल्प बसविण्यास मंजुरी मिळाली होती. एकूण १५ कोटींचा आराखडा मंत्रालयस्तरावर आहे. या संदर्भात बैठकीतूनच दूरध्वनीवरून पाणीपुरवठा विभागाचे सचिव संजय चहांदे यांसोबत पालकमंत्री भुजबळ चर्चा केली.
पाणी पुरवठ्याची वीज खंडित होऊन अनेक नवनवीन प्रश्न तयार होत असतात. यावर उपाय म्हणून हा वीजपुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना देखील महावितरणच्या अधिकाऱ्यांना यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी दिल्या आहेत.
तसेच धुळगाव, राजापूर आणि मनमाड येथील पाणीपुरवठा योजनेची माहिती घेत त्यांचेही आराखडे तयार करण्याच्या सुचना उपस्थित अधिकाऱ्यांना पालकमंत्री भुजबळ यांनी दिल्या आहेत.